आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्त्री भ्रूणहत्या: आता प्रत्‍येक जिल्‍ह्यात विशेष कारवाई पथक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बीड, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये मृत अर्भके सापडल्याने राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. भ्रूणहत्येची गंभीर दखल घेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष कारवाई पथक स्थापण्याचे आदेश मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी सोमवारी दिले. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिका-यांसह प्रमुख अधिका-यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. दरम्यान, भ्रूणहत्येत दोषी ठरलेल्या राज्यातील 49 डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव सरकारने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे पाठवला आहे.
प्रत्येक जिल्ह्यात पोलिस, महसूल आणि आरोग्य विभागाच्या अधिका-यांचा समावेश असलेले विशेष पथक स्थापन करावे, तसेच या पथकाने कारवाईचा अहवाल रोज संध्याकाळी सादर करावा, अशा सूचना बांठिया यांनी दिल्या.

अशी असेल कारवाई
गर्भपातासाठी वापरण्यात येणा-या औषधांचा बेकायदेशीर साठा करणा-या आणि प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देणा-या केमिस्टविरोधात होणार कारवाई.
स्त्रीरोग तज्ज्ञांनी एखाद्या महिलेला सोनोग्राफीचा सल्ला दिल्यास त्याची माहिती संबंधित सरकारी यंत्रणेला द्यावी लागेल. बीडसह ज्या ठिकाणी असे प्रकार अधिक घडत आहेत अशा जिल्ह्यांमध्ये केवळ शासकीय रुग्णालयातच सोनोग्राफी करता येईल.
कौन्सिलकडे प्रस्ताव
राज्यातील स्त्रीभ्रूणहत्येत दोषी एमबीबीएस आणि त्यावरील दर्जाच्या 41, बीएएमएसच्या 6 आणि बीएचएमएसच्या 2 डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव सरकारने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे पाठवला आहे. गेल्या दोन वर्षांतील ही कारवाई आहे.

विभागीय आयुक्तांकडे पथकांचे नियंत्रण
विशेष पथकांच्या माध्यमातून राज्यातील सोनोग्राफी सेंटर्स, गर्भपात केंद्रांची तपासणी करण्यात यावी. प्रसवपूर्व गर्भलिंग निदान कायद्याची अंमलबजावणी आणि विशेष पथकांच्या कारवाईवर विभागीय अयुक्तांनी नियंत्रण ठेवावे. शेजारील जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांशी समन्वय ठेवून गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्या होऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत.’’
जयंतकुमार बांठिया, मुख्य सचिव
औरंगाबादेत ज्योती मॅटर्निटी होममधील 2 सोनोग्राफी मशिन सील
सुकन्येच्या जन्मासाठी अजित पवारांना साकडे
मुलाच्या हव्यासापायी तब्बल सहावेळा सुनेचा गर्भपात