आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईवर संकटाचे ‘पॅराशूट्स’, सुरक्षा यंत्रणा सतर्क; ‘पीएमअाे’कडून दखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अतिरेक्यांच्या कायम हिटलिस्टवर असलेल्या मुंबई अांतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल २ वर शनिवारी सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी जेट एअरवेजचे अहमदाबादला जाणारे विमान उडण्याच्या तयारीत असताना वैमानिकाला हवाई उड्डाणमार्गात पाच छोट्या आकाराची पॅराशूट्स दिसल्याने खळबळ उडाली.
कोणतीही पूर्वसूचना न देता हवाई क्षेत्रात इतक्या आतपर्यंत ही पॅराशूट्स कशी आली आणि त्यांचा हेतू काय होता, असा प्रश्न सध्या विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांना पडला आहे. या घटनेला ४८ तास उलटून गेल्यानंतरही त्या पाच पॅराशूट्सचे गूढ कायम आहे. या घटनेचे गांभीर्य पाहता खुद्द पंतप्रधान कार्यालयाने याबाबतच्या तपासाचे आदेश देत संबंधित यंत्रणांकडून अहवाल मागवला.

जेट एअरवेजचे विमान मुंबईहून अहमदाबादच्या दिशेने टेकऑफ करण्याच्या तयारीत असतानाच मुख्य वैमानिक दिनेशकुमार यांना अचानक कालिना परिसराकडून हवाई उड्डाण मार्गात पाच छोटे पॅराशूट्स उडत येताना दिसले. दिनेशकुमार यांनी त्वरित याची माहिती हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (एटीसी)दिली. ही पाच पॅराशूट्स सुमारे सहा मिनिटे हवेत होती, त्यानंतर ती दिसेनाशी झाली.

तळाच्या रेकीचा संशय
या घटनेसंदर्भात पॅराशूट्स आणि पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या मुंबईतील सर्व संस्था तसेच विमान उड्डाणाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची कसून चौकशी केली जात आहे. त्याचबरोबर हवामानाचा अंदाज घेण्यासाठी हवामान खात्याने ही पॅराशूट्स उडवली होती का? अशी विचारणाही तपास यंत्रणांनी हवामान खात्याकडे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई विमानतळाची रेकी केली जात होती का? असाही संशय आहे.

सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
शनिवारी संध्याकाळी दिसलेल्या या पॅराशूट्समुळे मुंबईच्या हवाई सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबई हे देशातले दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातले ४८ व्या क्रमांकाचे सर्वात वर्दळीचे विमानतळ आहे. या विमानतळावरून दररोज ७८० विमानांची ये जा सुरू असते. तसेच जगातील जवळपास २००हून अधिक देशातले प्रवासीही या विमानतळावरून ये जा करत असतात. सुमारे ७५० हेक्टर परिसरात पसरलेल्या या विमानतळाच्या आजूबाजूला दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या झोपड्या आणि अगदी हाकेच्या अंतरावर असलेला समुद्र किनारा यामुळे या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली असते. तरीही हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

रिमाेटने नियंत्रणाचा संशय
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ही पॅराशूट्स नेहमीपेक्षा लहान आकाराची असून ती स्वयंचलित किंवा रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने नियंत्रित केलेली असावीत. विशेष म्हणजे अशा प्रकारे पॅराशूट्सचे उड्डाण किंवा पॅराग्लायडिंग करायचे झाल्यास संबंधितांना नागरी हवाई वाहतूक प्राधिकरण आणि विमानतळाच्या हवाई नियंत्रण कक्षाकडून परवानगी घ्यावी लागते. मात्र, अशी कोणतीही परवानगी न घेता सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील मुंबई विमानतळ परिसरात आलेल्या या पॅराशूट्समुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तातडीने बैठक
पंतप्रधान मोदींना आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर ही बाब संबंधित यंत्रणांनी गंभीरपणे घेतली असून पंतप्रधान कार्यालयाने याबाबतचा तपास अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहे. सोमवारी दुपारी याबाबत भारतीय हवाई दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, मुंबई पोलिस, भारतीय नौदल, मुंबई विमानतळ प्राधिकरण आणि नागरी हवाई वाहतूक प्राधिकरण या विभागाच्या अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक मुंबई विमानतळावर पार पडली.

ना अादेश, ना तक्रार
मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ आठचे उपायुक्त वीरेंद्र मिश्रा म्हणाले, सध्या तरी त्या घटनेबाबत कोणतीही माहिती उघड करता येणार नाही. मात्र सर्व संबंधित यंत्रणांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली जात आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलेल्या विचारणेबाबत ते म्हणाले, तसे कोणतेही लेखी आदेश अद्याप पोहोचले नाहीत. तसेच विमानतळ प्राधिकरणानेही पोलिसांकडे अद्याप घटनेची लेखी तक्रार दिलेली नाही. मात्र चौकशी सुरू आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...