आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Vehicles Gutted In Fire At Chakan Area Of Pune

पुणे: चाकण परिसरात अज्ञातांनी 5 वाहने जाळली!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: पत्र्याच्या शेडमधील जळालेली वाहनांची स्थिती...)
पुणे- पुण्यातील सिंहगड रोड परिसरात दोन दिवसापूर्वी सुमारे 90 दुचाकी व चारचाकी जाळून टाकल्यानंतर आज पुन्हा एकदा तशीच घटना चाकण परिसरात घडली. चाकणमध्ये चाकण-पुणे (जुन्या) रस्त्यावर मध्यरात्री दोनच्या सुमारास कोणीतरी अज्ञातांनी बंगल्यातील पत्र्याच्या शेडमध्ये लावलेली पाच वाहने पेटवून दिली. यात सर्व वाहने जळली असून, यात 8-10 लाखांचे नुकसान झाले आहे. जळालेल्या वाहनांत एक कार, एक सुमो जीप, एक होंडा, एक अॅक्टिव्हा, एक सीबीआर महागडी दुचाकी अशा पाच वाहनांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण परिसरात राहणारे किरण परदेशी यांनी आपली वाहने बंगल्याजवळील पत्र्याच्या शेडमध्ये लावली होती. अज्ञातांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास या वाहनांना लाग लावली व तेथून ते पसार झाले. किरण परदेशी व त्यांच्या घरातील सदस्यांना टायर जळाल्याचा उग्र वास आल्याने जाग आली. बाहेर येऊन पाहतात तर शेडमध्ये लावलेली पाचही वाहने जळत होती. त्यानंतर परदेशी कुटुंबियांनी या वाहनांची आग विझवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, आग त्यापूर्वीच लागल्याने व वाहनांनी चांगला पेट घेतल्याने ती जळून खाक झाली. जीपच्या डिझेल टाकीचा स्फोट झाला. कार, दुचाक्यांच्या इंधन टाक्या पूर्णपणे जळाल्या, पण त्यांचे स्फोट झाले नाहीत. शेजारच्या लोकांनी मदत केल्यामुळे तासाभरानंतर आग आटोक्यात आली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, नाशिक, औरंगाबाद या शहरांपाठोपाठ आता गाड्या व कार पेटविण्याचे लोन आता पुणे शहर व परिसरात पोहचल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पुण्यातील 90 वाहने जळीत कांडात पोलिसांना अद्याप कोणतेही धागेदोरे मिळाले नाहीत. त्यामुळे पोलिस नेमके करताहेत तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिसांनी गुन्हे रोखण्यातही यश येत नाही व गुन्हा केल्यानंतर आरोपींपर्यंतही पोहचता येत नसल्याने पोलिसांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.