मुंबई - पाचशे व एक हजार रुपयांच्या चलनातून रद्द झालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी गुरुवारी मुंबईसह राज्यभरातील सर्वच बँका व टपाल कार्यालयात नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. सकाळी नऊ वाजता बँका सुरू होतात, मात्र सकाळी सात वाजेपासूनच लाेक रांगा लावून उभे हाेते. नंतर दिवसभर मात्र सुरळीत व्यवहार झाले व हजाराे ग्राहकांना नोटा बदलून मिळाल्या. जुन्या नोटा रद्दबातल झाल्याने काहीसे चिंतेत असलेल्या ग्राहकांचे चेहरे नव्या काेऱ्या नोटात हातात पडताच एकदम खुलून गेलेले दिसले.
दरम्यान, ‘ग्राहकांनी घाबरून जाऊ नये. अाणखी ५० दिवसांचा अवधी असल्यामुळे एकाच दिवशी गर्दी करू नये, सर्वांना नोटा बदलून मिळतील,’ असे आवाहन बँका तसेच टपाल कार्यालयाकडून करण्यात अाले. बँकांच्या तुलनेत टपाल कार्यालयात गर्दी कमी दिसली.
शुक्रवारी तर बँका सुरू राहणार आहेतच, पण लोकांची अडचण होऊ नये म्हणून शनिवारी तसेच रविवारीही बँका सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. मात्र, तरीही अापल्याजवळील नोटा लवकरात लवकर बदलून घेण्यासाठी लाेक घाई करत असल्याचे दिसून अाले. गर्दी वाढत असल्यामुळे अनेक बँकांना जादा काउंटर उघडावे लागले.
अाठपेक्षा जास्त नकली नोटा आढळल्यास कारवाई
ग्राहकांनी बदलून घेण्यासाठी सादर केलेल्या नोटांच्या एका बंडलमध्ये ८ किंवा त्यापेक्षा जास्त नकली नोटा आढळल्यास त्याच्यावर पोलिस कारवाई करण्यात येईल, असे बँकांकडून स्पष्ट करण्यात आले. अशा प्रकारची माहिती पोलिसांना देऊन संबंधित ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मात्र, दोन- तीन नोटा नकली िमळाल्यास संबंधित ग्राहकांकडून त्याच्या आर्थिक व्यवहाराची सर्व माहिती बँक घेणार आहे.
पैसे काढण्यास मर्यादा
एका ग्राहकाला दिवसभरातून केवळ १० हजार रुपये, तर अाठवड्यातून कमाल २० हजार रुपये काढण्याची मर्यादा बँकांनी घातली आहे. तसेच एका व्यक्तीला प्रतिदिन केवळ चार हजारांपर्यंतच पाचशे व हजारच्या नोटा बदलून देण्यात येत आहेत. केवायसीधारक ग्राहकांना बँकेत पैसे जमा करण्याची मर्यादा नाही. मात्र, केवायसी नसलेल्या ग्राहकांना फक्त ५० हजारांपर्यंत पैसे जमा करता येतील.