आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत मृत्यूचे तांडव: विषारी दारूने घेतले 82 बळी, पाच आरोपी अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील मालवणी भागात विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 82 पर्यंत पोहोचला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिस खडबडून जागे झाले असून याप्रकरणी आतापर्यंत एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह आठ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे 2004 सालच्या मुंबईतील विक्रोळी दारूकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
मुंबईतील मालवणी परिसरातील राठोडी गावातील ज्युरासिक पार्क रिसाॅर्टलगतच्या लक्ष्मीनगर झाेपडपट्टीत बुधवारी रात्री एका स्थानिक दारूच्या गुत्त्यावर दारू पिण्यासाठी गेलेल्या स्थानिकांना पहाटेच्या सुमारास उलट्या, मळमळ, आम्लपित्ताचा त्रास जाणवू लागल्याने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. संध्याकाळपर्यंत दारू प्राशन केलेल्यांपैकी ५ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि परिसरात घबराट पसरली. सुरक्षेचा उपाय म्हणून इतर काही व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत परिस्थिती अधिकच गंभीर झाली. मध्यरात्रीपर्यंत उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून पन्नासच्या वर गेली.

शुक्रवारी सकाळपर्यंत परिस्थिती अधिकच गंभीर बनली आणि मृतांचा आकडा सातत्याने वाढू लागला. शनिवारी दुपारपर्यंत मृतांचा आकडा 82 पर्यंत पाेहोचला असून काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते आणि उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

याप्रकरणी राजू लंगडा, शंकर, फ्रान्सींस थॉमस, सलिम शेख यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली. तर राजूची आई मीना हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विक्रोळी घटनेची आठवण

या घटनेने २००४ मध्ये विक्रोळी आणि डिलाइल रोड परिसरातील विषारी दारूकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. २००४ मध्ये मिथेनॉल मिश्रित दारू प्यायल्याने पन्नासपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर शंभरपेक्षा अधिक जणांची प्रकृती गंभीर झाली होती. या दारूकांडानंतर तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राज्यात गावठी दारूबंदीचे आदेश जारी केले होते. या प्रकरणानंतर १३ पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबनही करण्यात आले हाेते. मात्र, त्या वेळी दिलेले राज्य शासनाचे हे आदेश धाब्यावर बसवले गेल्याचे या घटनेमुळे निष्पन्न झाले आहे.
आठ कर्मचारी निलंबित

मालवणी भागातील मृतांचा आकडा 90 च्या घरात गेल्याने सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्यासह पोलिस निरीक्षक जगदीश पन्हाळे, शंकर घारगे, मनीषा शिरसाट, राममिलन सिंग, अरुण जाधव, हेडकॉन्स्टेबल विलास देसाई आणि पोलिस नायक संजय माने या आठ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...