आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन महापालिकांमध्ये 55% मतदान, मालेगावला काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भिवंडी- निजामपूर, मालेगाव आणि पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी सरासरी ५५ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती राज्य निवडणूक अायुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. तसेच राज्यातील इतर  नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी सरासरी ७३.४ टक्के; तर धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शुक्रवारी या सर्वच ठिकाणी मतमाेजणी हाेऊन निकाल जाहीर हाेणार अाहे. भिवंडी- निजामपूर महापालिकेसाठी ५३ %, मालेगाव महापालिकेसाठी ६० %; तर पनवेल महापालिकेसाठी ५३ % सरासरी मतदान झाले. नागभीड (जि. चंद्रपूर)  नगर परिषदेसाठी ७१.५, नेवासा (जि. अहमदनगर) नगर पंचायतीसाठी ८१.४, रेणापूर (जि. लातूर) नगर पंचायतीसाठी ७६.७; तर शिराळा (जि. सांगली) नगर पंचायतीसाठी ८७.५  टक्के मतदान झाले. याशिवाय  जव्हार, श्रीवर्धन, चिपळूण, कसई-दोडामार्ग, धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु., औसा आणि अचलपूर या ७ नगर परिषद/ नगर पंचायतींतील एकूण ११ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी सरासरी ६१ टक्के मतदान झाले. या सर्व ठिकाणी २६ मे रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. त्यानंतर काही तासांतच सर्व ठिकाणचे निकाल जाहीर केले जातील, असेही सहारिया यांनी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये मालेगावला तुंबळ हाणामारी
मालेगाव महापालिकेसाठी बुधवारी मतदान झाले. मात्र, शांततेत सुरू असलेल्या मतदानाला एटीटी हायस्कूल मतदान केंद्राबाहेर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीने गालबोट लागले. यात तीन कार्यकर्ते जखमी झाले. हाणामारीनंतर पाेलिसांनी दाेन्ही गटांच्या जमावावर लाठीमार करून कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. घटनेनंतर दाेन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला हाेता.  
बातम्या आणखी आहेत...