आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळ निवारणासाठी केंद्राचे 574 कोटी प्राप्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी राज्य शासन महत्त्वपूर्ण निर्णय घेत असून केंद्राकडेही निधीची मागणी केली होती. त्यांच्याकडून राज्याला आतापर्यंत 574 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून उस्मानाबाद आणि जालना शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी अनुक्रमे 51 कोटी व 40 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळसदृश स्थितीवर मात करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती मदत व पुनर्वसनमंत्र्यांनी दिली. सोलापूर व पुणे येथील जनाई-शिरसाई, पुरंदर, उरमोडी व जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर या उपसा सिंचन योजनांची वीज देयके शासनामार्फत देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दुष्काळग्रस्त भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा विभागास राज्य शासनाकडून आतापर्यंत 413 कोटी 98 लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना पाणीपुरवठा योजनांच्या बाबतीत तातडीच्या उपाययोजना व योजनांचे विशेष दुरुस्तीचे अधिकार 25 लाख व एक कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

जलाशयात केवळ 35 % पाणी
टँकर्स भरून घेण्यासाठी विद्युत पंप तसेच आॅइल इंजिन भाड्याने घेण्यासाठी टंचाई निधीतून खर्च देण्यात येणार असून गावांना पाणीपुरवठा करणा-या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांच्या वीज बिलात 67 टक्के सवलत देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात एकूण दोन हजार 475 सिंचन प्रकल्प असून पाणी साठ्याची टक्केवारी फक्त 35 टक्केच आहे.
नगरमध्ये सर्वाधिक चारा छावण्या
राज्यात आतापर्यंत 553 जनावरांच्या छावण्या उघडण्यात आल्या असून यात चार लाख 52 हजार जनावरे आहेत. सगळ्यात जास्त चारा छावण्या अहमदनगर जिल्ह्यात असून त्यांची संख्या 231 आहे. सोलापूर जिल्ह्यात 126, औरंगाबाद जिल्ह्यात 4, बीडमध्ये 27, जालना जिल्ह्यात 18, उस्मानाबादेत 7, पुण्यात एक छावणी आहे.