आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचवी, आठवीच्या परीक्षा सुरू होणार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता आठवीपर्यंत बंद करण्यात आलेली परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीच्या नावाखाली काही वर्गांसाठी पुन्हा सुरू करण्याच्या प्रस्तावावर शिक्षण विभाग विचार करत आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मंगळवारी शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्या अध्यक्षतेखाली अधिकार्‍यांची बैठक झाली. शिक्षण आयुक्त चोकलिंगम, शिक्षण संचालक सर्जेराव जाधव व राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे बैठकीस उपस्थित होत्या. केंद्राने 2009 मध्ये केलेल्या शिक्षण हक्क कायद्याची राज्यात 2011 पासून अंमलबजावणी झाली. त्यानुसार पहिली ते आठवीपर्यंत संकलिक व आकारिक पद्धतीने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येते. अल्प गुणांच्या परीक्षा घेण्यात येतात. रूढ पद्धतीप्रमाणे परीक्षा होत नाहीत. विद्यार्थ्यांस नापासही केले जात नाही.

आता पाचवी व आठवीच्या पातळीवर मातृभाषा, इंग्रजी आणि गणित या विषयांची परीक्षा घेऊन यात नापास केले जाऊ नये, या प्रस्तावावर सरकारकडून विचार सुरू आहे.

दर्जा समजेल
सध्या आठवीपर्यंत परीक्षा नाहीत. परिणामी गणित व भाषा विषयांत विद्यार्थी दोन वर्षे मागे गेल्याचे ‘असर’चे सर्वेक्षण आहे. गणित, इंग्रजी व मातृभाषेची परीक्षा घेणे योग्य राहील. याचा उद्देश दर्जा तपासण्याचा आहे. विद्यार्थ्यास पास-नापास करण्याचा नाही, अशी माहिती बैठकीला उपस्थित असलेल्या एका अधिकार्‍याने दिली.

एकदा अपयश
शासनाने 2003 मध्ये फक्त इयत्ता चौथीच्या शेवटी अशी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. उच्च् न्यायालयाने तो रद्दबातल ठरवला. म्हणूनच आता निर्णय घेताना शासन पातळीवर प्रत्येक मुद्द्यावर दक्षता घ्यावी लागणार आहे.