आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्यांच्या'साठी रविवार ठरला घात वार, मुंबईतील 6 पर्यटक समुद्रात बुडून मुत्यूमुखी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रविवारची सुट्टी असल्याने रायगडमधील मुरुडला समुद्रकिना-यांवर गेलेल्या सहा पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. समुद्रात पोहण्यासाठी उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने 6 जण बुडाले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्वजण चेंबूरच्या घाटला व्हिलेज येथील रहिवासी होते. रोहित छगन झाला (47), विनोद अजाई (45), दिनेश पवार (40), दिलीप गोळे (48), संजय पांचाळ (45) (रा. चेंबूर घाटला), शंकर चव्हाण (42) (रा. मानखुर्द) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

शनिवार-रविवारच्या सुट्टीची मजा लुटण्यासाठी हजारो मुंबईकर लोणावळा, खंडाळा, मुरुड-जंजिरा येथे जातात. मुंबईत मागील आठवड्यात पाऊस पडल्याने हजारो पर्यटकांनी समुद्रकिनारी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. चेंबूर घाटला येथील मुक्तीनगरात नीलदुर्ग हॉटेलजवळ राहणार्‍या 15 जणांचा ग्रुप मिनी बसने शनिवारी मुरुडच्या समुद्रकिनारी लागूनच असलेल्या पार्वती लॉज येथे उतरला. रविवारी सकाळी यातील सात जण 11 वाजण्याच्या सुमारास समुद्रात पोहण्यास गेले. ज्या ठिकाणचा समुद्र अतिधोकादायक आहे तेथेच ते पोहोण्यास उतरले. खोलगट भागात गेल्याने त्यांना किनारा गाठता आला नाही आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान, समुद्र किना-यांवरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुरूड, काशिद किनार्‍यावर आपत्कालीन यंत्रणा म्हणून कायमस्वरूपी स्पीड बोटी, जीवरक्षक तैनात असतात. रविवारी मात्र ना स्पीड बोटी होत्या जीवरक्षक. स्पीड बोटी असत्या तर बुडणार्‍यांना वाचवता आले असते असे पर्यटकांचे म्हणणे आहे. केवळ आपत्कलीन यंत्रणेअभावी पर्यटकांचा हकनाक बळी गेल्याची हळहळ स्थानिक मच्छीमारांनी व्यक्त केली.
पिकनिकसाठी मुरुडच्या किनार्‍यावर गेलेल्या 15 जणांपैकी 6 जण बुडाल्याने चेंबूरमधील घाटला व्हिलेज नगरावर शोककळा पसरली. दुपारी टीव्हीवरच्या बातम्या झळकू लागल्या तसा तेथे सर्वत्र सन्नाटा पसरू लागला होता. हे सर्वजण ठेकेदार होते. छोटी मोठी कामे घेऊन ते आपला उदरनिर्वाह करीत होते.

पावसाळ्यात जास्त कामे मिळत नसल्याने त्यांनी पिकनिकचा बेत आखला होता. त्यांची वज्रमुठ कंस्ट्रक्शन ही संघटना आहे व त्याच्यामार्फत काही ठराविक लोक दरवर्षी पिकनिकला जायचे. यंदाही त्यांनी पिकनिकला जाण्याचा बेत आखला. पण रविवार त्यांच्यासाठी शेवटचा दिवस ठरला. दरम्यान, रविवारी सायंकाळी खासदार राहूल शेवाळे यांनी घाटला व्हिलेजमध्ये भेट देवून मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.