आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन युवकांची 7000 किमीची भ्रमंती, मुंबईत खेळणार होळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रंगांचा सण होळीचे आकर्षण भारतीयांसोबत देश-विदेशातही पाहायला मिळते. याच आकर्षणामुळे ऑस्ट्रेलियातील चार युवक मुंबईत होळी साजरी करण्यासाठी चक्क दुचाकीने येणार आहेत. कॅमेरून पेरी, स्कॉट ग्रिल्स, बेन बुचर आणि अेलर होगन अशी या युवकांची नावे असून त्यांनी ७००० किलाेमीटरची ‘भारत भ्रंमती’ करण्याचा निर्धार केला आहे. 

या दरम्यान ते भारतातील विविध ठिकाणी भेटी देतील. सोमवारी ते दिल्लीहून दुचाकीने मुंबईच्या कोळीवाडा भागात पोहोचतील आणि त्याठिकाणी स्थानिक बालकांसोबत मिळून होळी साजरी करतील. ‘राइट फॉर राइट्स’ या उपक्रमाअंतर्गत हे चारही युवक भारतात आले आहेत. यासाठी त्यांना सीआरवाय या स्वयंसेवी संस्थेकडून भारतात मदत मिळाली आहे. सीआरवाय ही संस्था भारतामध्ये बालकांच्या अधिकारांसाठी काम करते. कॅमेरून, स्कॉट, बेन आणि होगन हे मागील काही वर्षांपासून बालकांच्या अधिकारांसाठी ऑस्ट्रेलियात काम करत आहेत. याच अनुषंगाने त्यांनी भारतातील बालकांसमोरील आव्हाने, त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या आहेत. 

भारतीय बालकांसमोरील आव्हानांवर ते या काळात एक लघुपटही तयार करतील. शिवाय बालकांशी संबंधित अन्य मुद्द्यांवर जनजागृती करणे आणि त्यांच्या विकासकामांसाठी मदतनिधी गोळा करण्याचे कामही ही मंडळी करेल.   

अनेक राज्यांमध्ये दुचाकीने भटकंती  
सीआरवायकडून प्राप्त माहितीनुसार, या चारही युवकांनी राजधानी दिल्लीतून आपल्या दुचाकी भारत भ्रमंतीला सुरुवात केली आहे.  सोमवारी ते मुंबईच्या कोळीवाडा भागात पोहोचतील आणि तेथील बालकांसोबत होळी साजरी करतील. त्यानंतर दुचाकीनेच महाराष्ट्रातील विविध शहरांना भेटी देतील. त्यानंतर गोवा आणि कर्नाटकमध्ये जातील. या दोन्ही राज्यांमधील अभियान संपल्यानंतर शेवटच्या टप्प्यात ते आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि ओडिशासह उत्तराखंडमध्येही जातील.
बातम्या आणखी आहेत...