आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हाेलसेल’ बदल्यांवरून खडसे, तावडे नाराज, बदलीआधी बापट-कपूर यांच्यात वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकाच दिवशी आणि रात्री उशिरा ७३ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत नाराजीचा सूर उमटला. एकनाथ खडसे व विनोद तावडे हे ज्येष्ठ मंत्री नाराज असून खडसेंनी तर बैठकीतच स्पष्टपणे नाराजी बाेलून दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

खडसेंच्या मदत व पुनर्वसन विभागात सचिव म्हणून कडक शिस्तीच्या अधिकारी मालनी शंकर यांची नियुक्ती झाली अाहे. शिस्तीच्या अट्टहासापोटी त्यांचे मंत्र्यांबरोबर अनेकदा वाद होत असतात. याचा अनुभव जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना आला असून त्यांनीच मुख्यमंत्र्यांना मालन यांची बदली करण्याची विनंती केली होती. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनवर्सन हे खाते महत्त्वाचे असताना ‘असे’ अधिकारी देऊन तुम्ही नक्की काय साधत आहात, असा खडसेंचा सवाल होता. सत्तेवर अाल्यापासून फडणवीस यांनी महत्त्वाच्या विभागात अापले ‘विश्वासू’ अधिकारी नियुक्त करून मंत्र्यांची अवस्था बिकट केली होती. याअाधी खडसे व मनुकुमार श्रीवास्तव यांंचेही पटत नव्हते. अाता मनुकुमार यांना बदलून मालिनींची नियुक्ती झाल्याने खडसेंची काेंडी मात्र कायम राहिल्याची चर्चा अाहे. विनोद तावडेंकडील उच्च व तंत्रशिक्षण विभागात सीताराम कुंटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुंटे यांची वर्षभरातील ही चौथी बदली अाहे. कुंटे हे मनापासून काम करत नसल्याच्या काही मंत्र्यांच्या तक्रारी आहेत. अशा अधिकाऱ्याची आपल्या विभागात बदली झाल्याने तावडे नाराज झाले आहेत.

बदलीआधी बापट-कपूर यांच्यात वाद
अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट व सचिव दीपक कपूर यांच्यामध्ये कमालीचा वाद होता. बापट घेत असलेल्या निर्णयाला कपूर यांनी सुरुवातीपासून विरोध केला होता. त्यातच बदली होण्याआधी एका वाहतूकदाराला ९० कोटी देण्याच्या फाइलवरून बापट व कपूर यांच्यामध्ये वाद सुरू होता.

या फाइलवर सही करण्यास कपूर तयार नव्हते. शेवटी खूप तणातणीनंतर ही फाइल वित्त विभागाकडे गेली खरी; पण तेथूनही ती परतल्याने बापट साफ निराश झाल्याचे समजते. कपूर यांची बदली करा, अशी सातत्याने मागणी बापट करत होते. अखेर ती झाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
बातम्या आणखी आहेत...