आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापा-याकडे 75 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोघांना मुंबईत अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - व्यापा-याकडे 75 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने दोन जणांना अटक केली. त्यापैकी एकाला यापूर्वीच खंडणीच्या एका गुन्ह्यामध्ये अटक झाली असून दुसरा पोलिसांचा खब-या आहे.
काही दिवसांपासून उपनगरातील एका व्यापा-याला भागीदारीच्या वादावरून त्याचा दुबईस्थित भागीदार इक्बाल हा धमकावत होता. या व्यापा-याने 75 लाख रुपयांची खंडणी न दिल्यास त्याला व त्याच्या नातेवाइकांना जिवे मारण्याची धमकी इक्बालने दिली होती, परंतु त्या व्यापा-याने त्याच्या धमकीकडे दुर्लक्ष केले. मात्र, गुरुवारी मोहंमद जुनेद अब्दुल लतीफ खत्री (वय 35) व सलीम मोहंमद इलियास शेख (वय 33) या दोघांनी संबंधित व्यापा-याला गाठून एका दिवसात खंडणी न मिळाल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या व्यापा-याने खंडणीविरोधी कक्षाकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला.


इक्बालचा साथीदार जुनेद याने व्यापा-याला विलेपार्ले येथील शान सिनेमागृहाजवळ पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्या वेळीच पोलिसांनी जुनेद व सलीम यांना अटक केली. चौकशीत या दोघांचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. जुनेदला 2004मध्ये खंडणीच्याच गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती, तर सलीम हा पोलिसांचा खब-या असल्याचे निष्पन्न झाले.