आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या पंधरवड्यातील तूट पाऊस भरून काढेल; राज्यभरात सरासरीच्या 78% पावसाची नोंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/औरंगाबाद- सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात नैऋत्य मोसमी पाऊस पुन्हा देशभर सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. हा  पाऊस तूट भरून काढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आयएमडीचे महासंचालक के.जी. रमेश म्हणाले,  सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. सध्या नैऋत्य मान्सून मध्य महाराष्ट्र व विदर्भात सक्रिय असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. आग्नेय अरबी समुद्रात केरळ किनारपट्टीलगत चक्रवात स्थिती असून, दक्षिण मध्य महाराष्ट्र ते कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत द्राेणीय कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात सध्या चांगला पाऊस होत आहे.   
 
राज्यातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागात चांगला पाऊस पडल्यामुळे धरणांच्या साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. राज्यात १ जून ते ११ सप्टेंबरपर्यंत ७८७.१ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीच्या ७७.९ टक्के एवढा असून गेल्या वर्षी याच सुमारास तो सरासरीच्या ८५.४ टक्के एवढा झाला होता. राज्याच्या जलाशयातील सर्व प्रकल्पांतील पाणीसाठ्यात ६६.८८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून गेल्या वर्षी याच सुमारास ६८.२३ टक्के पाणी साठा होता. 
 
पावसाचा अंदाज
- १३ व १४ सप्टेंबर रोजी राज्यात सर्वत्र विजांचा कडकडाट व  मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.    
- १५ व १६ सप्टेंबर रोजी  मराठवाड्यात काही ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे.

राज्यात ३०२ टँकर्स सुरू
राज्यातील ३१२ गावे आणि १५०४ वाड्यांना आजअखेर ३०२ टँकर्समार्फत पाणी पुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी याच दिवसांत १४४ गावे आणि ६८० वाड्यांसाठी २०४ टँकर्स सुरू होते. प्रामुख्याने औरंगाबाद, बुलढाणा, अहमदनगर, जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील टंचाईग्रस्त गावांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

राज्यातील पर्जन्यमान
७ जिल्हे : १०० % हून जास्त पाऊस-  
ठाणे, रायगड, पालघर, अहमदनगर, पुणे, बीड, उस्मानाबाद.
१२ जिल्हे : ७६ ते १००% पाऊस; 
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सातारा, सांगली, जालना, लातूर, बुलढाणा, नागपूर.
१४ जिल्हे : ५१ ते ७५% पाऊस
जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
यवतमाळ : २६ ते ५० % पावसाची नोंद झाली आहे. (सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेला पाऊस)

धरणांत ६७% पाणी साठा
जलाशयातील विभागनिहाय सध्याचा आणि कंसात गतवर्षीचा साठा पुढीलप्रमाणे-  मराठवाडा ५०.०५% (३५.५७), कोकण ९४.३२% (९२.१२), नागपूर  ३५.१५% (५८.४४), अमरावती २६.७७% (६५.८२), नाशिक ७४.९८% (७१.५८) पुणे ८६.१०% (८०.६५)
बातम्या आणखी आहेत...