आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीचा उत्सव; डाेंबिवलीत सारस्वतांच्या साेहळ्याची जय्यत तयारी, तीन दिवस भरगच्च कार्यक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोंबिवली - अाजपासून सारस्वतांच्या कुंभमेळ्याला डाेंबिवलीत सुरुवात हाेणार अाहे. पिंपरी येथे झालेल्या ८९व्या संमेलनाचा दिमाख बघता पुढील संमेलन कुठे अाणि कसे हाेते यावर बरीच चर्चा झाली. ती शमते ताेच पुन्हा निवडून अालेले अध्यक्ष काेण? हे साहित्य विश्वाला माहितीच नाही यावरही बरेच चर्चा-चर्वण झाले.  या सगळ्यातून बाहेर पडत अाता डाेंबिवलीत हा मराठीचा उत्सव हाेत अाहे. या संमेलनात नियमित परिसंवादांबराेबरच कवितेसाठी खास वेगवेगळी व्यासपीठं देण्यात अाली अाहे हे विशेष. तर तीन दिवस भरगच्च कार्यक्रम अाखण्यात अाल्याने रसिकांचा या उत्सवातील अानंद द्विगुणित हाेणार अाहे.

संमेलनाध्यक्ष डाॅ. अक्षयकुमार काळे यांचा परिचय
डॉ. अक्षयकुमार काळे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातल्या वरुड गावचा. एका शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या डॉ. काळेंना सामाजिक, सांस्कृतिक आणि वाङ‌्मयीन कार्याचा वारसा परंपरेने लाभला. १९७४ साली ते एम.ए. मराठी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी पीएच.डी. पदवी त्यांनी मिळवली. तर वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी डी.लिट पदवी प्राप्त केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ते मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. २०१५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बारा विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली. विद्यापीठातील विविध पदं आणि स्पृहणीय कार्याबद्दल त्यांना कुलगुरुंचे सन्मानचिन्ह आणि महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कारही मिळाला आहे. मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. चर्चासत्रांचे आयोजन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवरील साहित्य संमेलनाचे आयोजन, विविध परिसंवाद, विविध साहित्य साहित्यिक- सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले आहे.

डॉ. अक्षयकुमार काळे यांचा आवडीचा विषय कविता आहे. काव्यसमीक्षा हा त्याचा आपला एक खास प्रांत आहे. समीक्षा आणि आस्वाद हा त्यांचा पिंड. गेली चाळीस वर्ष काव्यसमीक्षेवर ते लिहित आहेत. विविध चर्चासत्र आणि परिसंवादात त्यांनी या विषयावर विवेचन केले आहे. १९८५ साली ‘सूक्तसंदर्भ’ हा पहिला लेखसंग्रह त्यांचा प्रकाशित झाला. पुढे गोविंदाग्रज-समीक्षा, कविता कुसुमाग्रजांची या सर्व ग्रंथात त्यांनी सविस्तर विवेचन केले आहे. अर्वाचीन मराठी काव्यदर्शन या त्यांच्या काव्यग्रंथात १८८५ ते १९९५ या कालखंडातील आकारास आलेल्या काव्याची संयत, साधार चिकित्सा केली आहे. डी.लीट.साठीच्या अभ्यासाच्या विषयात ‘अत्याधुनिक काव्यप्रवाह आणि काव्यप्रकारांचे’ चिकित्सक आकलन त्यांनी केले आहे. मर्ढेकरांची कविता आकलन आस्वाद आणि चिकित्सा या पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन ग्रंथांत मर्ढेकरांच्या कवितेची साधार चिकित्सा त्यांनी केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यक्ती आणि वाङ‌्मय या ग्रंथाचे संपादनही केले आहे.
 
ग्रेसविषयी हे एक त्यांचे आगळेवेगळे पुस्तक आहे. ग्रेस यांची प्रदीर्घ मुलाखत घेऊन ग्रेस यांच्या अनुभूतीविश्वाचे घटक त्यांची गुंतागुंत, निर्मितीप्रक्रिया, रचनेतील तर्कबंध, वास्तव आणि अद‌्भुतता, कवितेतील गेयता सुभाषितं, यासंबंधीचे आकलन या ग्रंथात आहे. प्रतीतिविभ्रम या संग्रहात कवींच्या काव्यावरील परीक्षणात्मक लेखन त्यांनी संपादित केले आहे.

नारायण सुर्वे आणि सुरेश भट यांच्या प्रदीर्घ मुलाखतीत त्याच्या वाङ‌्मयीन व्यक्तिमत्त्वाची सूक्ष्म मांडणी केली आहे. ‘गालीबचे उर्दू काव्यविश्व : अर्थ आणि भाष्य’ हा एक त्यांचा गाजलेला ग्रंथ यात काव्याभिरुची आणि समीक्षा सामर्थ्याचे वेगळे परिणाम दिसून येतात. या ग्रंथास मराठवाडा साहित्य परिषदेचा म. भि. चिटणीस पुरस्कार, महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा सेतू माधवराव पगडी पुरस्काराने त्यांचा गौरव केला आहे. ६४ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचा सन्मानही त्यांना मिळाला आहे. डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या काव्यसमीक्षेचा गौरव व्हावा म्हणून ‘अर्वाचीन मराठी काव्यसमीक्षा’ हा ग्रंथ त्यांच्या लेखनासंबंधी लिहिला गेला आहे. त्यांच्या काव्यसमीक्षेचा हा मोठा गौरव आहे. ‘डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या काव्यसमीक्षेचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर नागपूर विद्यापीठात पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्याने त्यांच्यावर पीएच.डी.ही मिळवली आहे.
 
 "अापली भाषा समृद्ध करण्याकरिता दुसरी भाषा हटवण्याची वस्तुत: काही गरज नसते. स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे उलटल्यावरही इंग्रजीचे महत्त्व अबाधितच राहिले अाहे व राहणार अाहे. ती शिक्षणाची भाषा अाहे, ज्ञानभाषा अाहे, विनिमय भाषा अाहे. तिच्या अव्हेरात मराठी भाषेचे किंवा भारतीय जनतेचे काही कल्याण अाहे असे समजणे अज्ञानाचे लक्षण अाहे. इंग्रजीचे पाय न ताेडता मराठी भाषेची उंची अापल्याला वाढविता का येणार नाही? याचा विचार किंबहुना प्रयत्न केला पाहिजे."
- संमेलनाध्यक्ष डाॅ. अक्षयकुमार काळे 

स्वागताध्यक्ष वझे यांचा परिचय
- शैक्षणिक पात्रता : बी.कॉम. एलएल.बी
सामाजिक व राजकीय कार्य :
- जनरल सेक्रेटरी (जी.एस ) : के. व्ही. पेंढारकर कॉलेज, डोंबिवली (१९८६)
- संस्थापक अध्यक्ष : आगरी यूथ फोरम (१९९१)
- अध्यक्ष : सर्वपक्षीय गायरान बचाव कृती समिती (संजय गांधी उद्यानातील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या विरोधात )
- अध्यक्ष : ग्लोबल कॉलेज ऑफ आर्ट‌्स अॅण्ड कॉमर्स डोंबिवली (प.)
- संस्थापक सचिव : सर्वपक्षीय संघर्ष समिती २७ गावे वगळण्याबाबत.
- माजी अध्यक्ष : मानपाडा ब्लॉक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
- संस्थापक अध्यक्ष : श्री सद‌्गुरू दुग्धव्यवसाय सहकारी संस्था, 
ता. कल्याण
- संचालक : ज्ञानसागर शिक्षक प्रसारक मंडळ, डोंबिवली
- माजी सचिव : अखिल भारतीय नाट्यसंमेलन संयोजन समिती, डोंबिवली
- पक्षाचे पद : प्रदेश प्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - महाराष्ट्र राज्य
- अध्यक्ष : अखिल भारतीय “आगरी महोत्सव’’ संयोजन समिती
- स्वागताध्यक्ष : ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, डोंबिवली.

"संमेलन दिमाखदार हाेणार अाहे. मराठी साहित्याचा जागर अागळ्या-वेगळ्या पद्धतीने हाेणार अाहे. त्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांचे अादरातिथ्य यात काहीच कमी पडणार नाही. संमेलनाची सगळी तयारी पूर्ण झालेली अाहे."
- स्वागताध्यक्ष वझे 

संमेलनासाठी ४० कलाकारांनी गायलेे खास थीम साँग
साहित्य संमेलन मराठीजनांपर्यंत पाेहाेचावं यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जातात. यंदाच्या संमेलनासाठीही प्रथमच एक थीम साँग तयार करण्यात अाले अाहेे विशेष म्हणजे हे गाणं डोंबिवलीमधील जवळजवळ २८ कलाकारांनी गायले अाहे. हे गीत साेशल मीडियावर व्हायरल करण्यात अाल्याने ते अनेकांपर्यंत पाेहाेचलेले अाहे.

सरस्वतीच्या पदस्पर्शाने झाली धरणी पावन
शब्दप्रभूंचे रसिकांशी हे जीवाशिवाचे मीलन
संमेलन, संमेलन, हे शब्दांचे संमेलन 
संमेलन, संमेलन, साहित्याचे संमेलन 
चरित्र, कादंबरी, कथा या साऱ्यांचा संदेश मराठी 
नाट्य, चित्रपट, दूरचित्र येती लेऊनी वेश मराठी 
ओव्या, अभंग, गोंधळ, भारुड, भक्तीची ती आस मराठी 
लोकगीत, भावगीत, कविता अन‌् गझलेचा श्वास मराठी 
सह्याद्रीच्या छातीवरची रांगडी तरी गोड 
परदेशातून आंतर जालावर जपलेली ओढ
प्रबोधनाचे भान ठेवुनी रसिकमनाचे रंजन 
संमेलन, संमेलन, डोंबिवलीचे संमेलन 
संमेलन, संमेलन, हे नव्वदावे संमेलन 
फलक, तोरणे, रांगोळ्यांनी मंद, सुशोभीत 
विशाल प्रांगण 
साहित्यातील दीप्तीमान ताऱ्यांचे लखलखते हे तारांगण 
भाषण, चर्चा, परिसंवाद, मुलाखतीही सादर
कविसंमेलन, मुशायरे अन‌् काव्याचा जागर
व्यासपीठावर विद्वत्तेची मांदियाळी अन‌् समोर दर्दी 
ग्रंथखरेदीसाठी साऱ्या दालनांमध्ये सुजाण गर्दी
प्रतिभेच्या तेजाला साऱ्या रसिकांचे हे वंदन
संमेलन, संमेलन, हे शब्दांचे संमेलन 
संमेलन, संमेलन, साहित्याचे संमेलन 
आगरी ठाकरी संगमेश्वरी
धनगरी कोकणी मालवणी
वऱ्हाडी अहिराणी मावळी
डांगी दख्खिनी वडवाळी
मराठी, मराठी, मराठी, मराठी, 
मराठी, मराठी, मराठी, मराठी, 
रंग वेगळे, ढंग वेगळे, एक तरीही स्पंदन
संमेलन, संमेलन, हे शब्दांचे संमेलन 
संमेलन, संमेलन, साहित्याचे संमेलन
संमेलन, संमेलन, डोंबिवलीचे संमेलन 
संमेलन, संमेलन, हे नव्वदावे संमेलन 

- आनंद पेंढारकर यांनी हे गीत शब्दबद्ध केले अाहे. तर सुखदा भावे-दाबके यांनी या गीताला स्वरबद्ध केले अाहे. 
 
तीन दिवसीय संमेलनाची सुरुवात शुक्रवार, 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडीने होईल. गणेश मंदिर येथून निघालेली ग्रंथदिंडी पु.भा.भावे साहित्य नगरी येथे पोहोचल्यानंतर ध्वजारोहण होईल. सकाळी 10.15 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रा.चिं. ढेरे ग्रंथग्राम येथे ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन 89 वे संमेलानाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होईल. 
 
दोन कार्यक्रम प्रथमच 
- 90 वे संमलेनाचे वेगळेपण हे आहे, की यात प्रसिद्ध साहित्यिकांसोबतच नवोदित लेखक-कवींना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाणार आहे. 
    - युद्धस्य कथा हा आगळावेगळा कार्यक्रम साहित्य संमेलनाच्या मांडवाखाली प्रथमच होत आहे. त्यासोबतच टॉक शो होणार आहे. 
    - 'युद्धस्य कथा' या कार्यक्रमात लष्करातील अधिकारी त्यांचे अनुभव कथन् करणार आहे. 
    - 'प्रतिभायान' या आणखी एका वेगळ्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील तीन मान्यवरांशी मुलाखत स्वरुपात चर्चा होणार आहे. 
    - 'साहित्य व्यवहार आणि माध्यमांचे उत्तरदायित्व' या विषयावर टॉक शो आयोजित करण्यात आला आहे. 
    
मराठवाडी, मालवणी, झाडीबोलीतील कथांची मेजवाणी 
- साहित्य रसिकांना महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांताच्या बोली भाषेतील कथा ऐकण्याची संधी डोंबिवलीत मिळणार आहे. 
- अहिराणी, मराठवाडी, मालवणी, झाडीबोली, कोल्हापूरी, आदी बोलीभाषेतील कथांची रसिकांसाठी मेजवाणी आहे.
 
 
 
पुढील स्लाइडवर पहा... 
- पवार, फडणवीस, राज ठाकरेंची उद‌्घाटनाला उपस्थिती...
- समाराेपाला उद्धव ठाकरे आणि विनोद तावडे...
- विविध कार्यक्रमांत कोण सहभागी होणार...?
- कार्यक्रम पत्रिका...
     
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...