मुंबई - देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या वानखेडे स्टेडियमवरील शाही शपथविधीसाठी ९८.३३ लाख रुपये खर्च झाला. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत माहिती मागितली होती. राज्यात तीव्र दुष्काळ आहे. तिजोरी रिकामी आहे, असा भाजपचाच दावा होता तरीही ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी वानखेडे स्टेडियमवर शाही शपथविधी समारंभ घेतला व त्यासाठी ९८.३३ लाखांची उधळपट्टी केली, असा आरोप गलगली यांनी मंगळवारी प्रसिद्धी पत्रकात केला. पक्षाने या समारंभावर किती खर्च केला, या प्रश्नाला मुंबई भाजपने प्रतिसादही दिला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.