आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई बॉम्बस्फोटांची 25 वर्षे: पाकचा बुरखा फाडू न शकल्याचे अाजही शल्य : अॅड. निकम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- १९९३ च्या बाॅम्बस्फाेटातील २० हून अधिक अाराेपींना फाशीची शिक्षा ठाेठावण्यात विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. सुमारे १४ वर्षे चाललेल्या या खटल्यात त्यांनी अभ्यासपूर्ण युक्तिवाद केला. तसेच ८ ट्रक कागदपत्रे, ३ ट्रक मुद्देमाल सादर करून १४० आरोपींविराेधात सरकार पक्षाची बाजू मांडली. यातील काही अाराेपींना शिक्षा झाली हे खरे असले तरी या स्फाेटांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे सिद्ध करण्यात यश अाले नसल्याचे खंत अॅड. निकम यांची ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केली.  


निकम म्हणतात, ‘  या खटल्यातील आरोपींच्या विरोधात खून, कट रचणे आणि भारताविरोधात युद्ध ही तीन महत्त्वाची कलमे लावण्यात आली होती.  दुबईत या स्फोटांचा कट रचण्यात आला आणि पाकिस्तानात त्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात आले हे मी न्यायालयात मांडणार होतो.  त्यासाठी आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या त्यांच्या पासपोर्टांचे पुरावे पुरेसे होते. त्यांच्या पासपोर्टवर मुंबई आणि दुबई सोडल्याच्या नोंदी होत्या, परंतु पाकिस्तानात प्रवेश केल्याच्या नोंदी जाणीवपूर्वक टाळण्यात आल्या होत्या.  मी हे न्यायालयात सिद्ध करत होतो. यातील माफीचा साक्षीदार फारूक टकल्या यानेही त्याच्या तपासणीत इस्लामाबाद विमानतळावर आपली कोणतीही तपासणी झाली नसल्याचे न्यायालयात कबूल केले होते. 


परंतु, यात पाकिस्तानविरोधातील ठोस पुरावा नसल्याचे मांडत सीबीआयने या खटल्यातील भारतासोबतच्या युद्धाची कलमे काढून टाकली.  त्यामुळे त्याच वेळी आपण पाकिस्तानचा बुरखा फाडू शकलो नाही हे शल्य मला आजही आहे. मात्र, २६/११ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात मी पाकिस्तानचा सहभाग सिद्ध करू शकलो ते याच खटल्यामुळे. १९९३ च्या बॉम्बस्फोटात पाकिस्तानचा सहभाग होता हे मी आजही ठामपणे सांगू शकतो. त्या स्फोटांचे मुख्य सूत्रधार टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिम कायद्याच्या कक्षेपासून लांब राहण्यासाठी आजही पाकिस्तानात लपून राहिले आहेत.  

 

जळगावबाहेरचा माझा हा पहिलाच खटला  
जळगावच्या सीमा ओलांडून मुंबईत चाललेला माझ्या कारकीर्दीतील हा पहिल्याच महत्त्वपूर्ण खटला हाेता. मुंबईत एवढे नामांकित वकील असताना माझ्यासारख्याला जळगावातून या खटल्यासाठी सरकारने का नेमले, असे अनेक प्रश्न विचारले जात हाेते. अनेक जण माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघत होते. या खटल्याचे स्वरूप आणि आरोपींसाठी उभे असलेले दिग्गज वकील बघून त्यांच्यासमोर आपण सामना कसा करावा, हा प्रश्न मलाही पडला होता. शिवाय मराठी शाळेत शिकल्याने, मुंबईतील वकिलांच्या हायफाय इंग्रजीपुढे आपला टिकाव कसा लागणार, हीदेखील शंका मनात होती.  मात्र केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर मी या दोन्ही शंकांना मागे सारले आणि खटला लढलो.  पहिल्याच दिवशी पत्रकारांनी माझ्यावर प्रश्नांचा भडिमार केला, ‘टायगर मेमनला केव्हा आणणार?’  मी म्हणालो, ‘कोणता टायगर? मी एकाच टायगरला ओळखतो, तो जंगलातला. पळपुट्यांना ‘टायगर’ समजून खऱ्या टायगरचा अपमान करू नका.’  माझे त्या उत्तर मुंबईकरांना जळगावच्या रखरखत्या उन्हाची दाहकता सांगून गेले.

बातम्या आणखी आहेत...