आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई बॉम्बस्फोटांची 25 वर्षे:...आणि क्षणात परिसर गोठल्यासारखा झाला- प्रकाश पार्सेकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

याला नशीब म्हणायचं की दुर्दैव म्हणायचं, हे मला ठाऊक नाही, पण अवघा देश हादरवून टाकणाऱ्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या भीषण घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार होण्याचा अनुभव मी घेतला. मी त्या वेळी सायंदैनिक ‘महानगर’चा फोटो एडिटर होतो. साधारण दोन-अडीच ही माझी ऑफीसला जाण्याची वेळ असे. त्या दिवशी बायकोला चेंबूरला जायचे म्हणून शिवसेना भवनासमोरच्या बसस्टॉपवर तिला स्कुटरने सोडायला गेलो होतो.  मला आठवतंय, मी रस्त्याच्या कडेला स्कुटर लावली.  बस आली. बायकोला बसमध्ये बसवलं. बस रहदारीतून थोडी पुढे सरकली. मी स्कुटरकडे वळलो. सुरु करण्यासाठी म्हणून किक मारु लागलो, तसा समोरच्या बाजूला असलेल्या पेट्रोल पंपावरून स्फोटाचा प्रचंड मोठा आवाज झाला. त्या आवाजाच्या दिशेने मी झरकन वळून पाहिलं.  संबंध परिसर एका क्षणात गोठल्यासारखा झाला. पण कधी बॉम्बस्फोट झाले नसल्याने कुणाला काही अंदाज येत नव्हता. लोक सैरावैरा धावत होते. पेट्रोल पंप उद‌््ध्वस्त झाल्यासारखा झाला होता. मी प्रसंगावधान राखत पटकन स्कुटरला लावलेली कॅमेराची बॅग उघडली आणि जमेल तसे पटापट फोटो घेत राहिलो. तोवर रस्त्यावरची पळापळ वाढलेली होती. आरडाओरडा, किंचाळ्या वाढल्या होत्या. एव्हाना शेजारच्या बालमोहन शाळेत पालकांची गर्दी झालेली होती. प्रत्येक जण आपल्या मुला-मुलींना अक्षरश: उचलून नेत होते.  काही तरी अघटित घडलंय असं माझ्यातला पत्रकार मला सांगत होता. या गदारोळात बायको ज्या बसमध्ये बसली होती, ती बस पुढे जाऊन तिथेच थांबली होती. प्रवासी वेगाने बस सोडून बाहेर पडत होते. त्यात माझी बायकोसुद्धा होती. तिला घेऊन मी सरळ ऑफीस गाठलं. तिथे गेल्यावर सगळाच उलगडा झाला. मुंबईत एकाच वेळी १२ बॉम्बस्फोट झाले होते. सर्वत्र  हाहाकार माजलेला होता. मी फोटो डेव्हलपिंगला दिले. परत बॅग खांद्यावर टाकली आणि मुंबईचा चेहरा टिपण्यासाठी बाहेर पडलो.  केईएम हॉस्पिटलच्या दिशेने जाऊ लागलो.  घोळक्या घोळक्याने लोक उभे होते. प्रत्येकाच्या ओठी बॉम्बस्फोटाचीच चर्चा होती. वाटेत एक बोर्ड लिहिलेला होता, ‘रक्त पाहिजे’.  मी अंदाजानेच केईएममध्ये शिरलो. एकच गोंधळ माजलेला होता. 

 

सगळ्यांच्याच हालचालींना वेग आलेला होता. ते सगळे मी कॅमेरात टिपत होतो. साधारण अर्ध्या तासाने मी हॉस्पिटल बाहेर आलो. बोर्ड पाहिला-’पुरेसे रक्त जमा झाले आहे. लागल्यास पुन्हा कळवू.’ ते वाचून मी नखशिखांत शहारलो. मुंबईच्या स्पिरीटला मनोमन सलाम केला...

 

> ‘मी स्कुटरकडे वळलो. सुरु करण्यासाठी म्हणून किक मारु लागलो, तसा समोरच्या बाजूला असलेल्या पेट्रोल पंपावरून स्फोटाचा प्रचंड मोठा आवाज झाला. त्या आवाजाच्या दिशेने मी झरकन वळून पाहिलं.  संबंध परिसर एका क्षणात गोठल्यासारखा झाला...’

- प्रकाश पार्सेकर, ज्येष्ठ छायाचित्रकार-संपादक

बातम्या आणखी आहेत...