आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई बॉम्बस्फोटांची 25 वर्षे : स्फाेटात उद‌्ध्वस्त व्हॅनच ठरली तपासाचा दुवा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 मुंबई- बारा मार्च १९९३.. दुपारचे सव्वा दोन वाजलेले माहिमच्या अल हुसैनी इमारतीतून तीन गाड्या बाहेर पडल्या. त्यापैकी एक होती मारूती व्हॅन..चिकना, बबलू, बादशहा खान, शेख अली आणि बशीर खान हे सर्व या व्हॅनमधून कॅडल रोडवरून महापालिकेच्या दिशेने निघाले होते. मुंबई महापालिका आणि मंत्रालय परिसरात बॉम्ब पेरण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.. ते प्रभादेवी परिसरात पोहोचेपर्यंत सेनाभवनाजवळच्या लकी पेट्रोलपंपाबाहेरचा चौथा बॉम्बस्फोट झाला होता. गप्पा मारत असताना अचानक व्हॅनच्या मागे असलेल्या स्फोटकांमधील एका डिटोनेटरमधून ठिणग्या बाहेर पडू लागल्या..तो फुटेल या भीतीने चिकनाने तो डिटोनेटर उचलून बादशहा खानकडे दिला. त्यानेही क्षणाचा विलंब न करता तो डिटोनेटर खिडकीकडे बसलेल्या शेख अलीकडे दिला. घाबरलेल्या अलीने तो खिडकीबाहेर फेकला. तेवढ्यातच जवळच असलेल्या सेन्चुरी बाजारबाहेरील कमांडर जीपमधील पाचव्या शक्तीशाली बॉम्बचा स्फोट झाला. त्या स्फोटाच्या आवाजाने या सर्वांचे कान बधीर झाले. त्या स्फोटामुळे आणि आपल्या मारुती व्हॅनमधील स्फोटकांचा स्फोट झाला तर काय होईल या कल्पनेने भेदरलेल्या पाच जणांनी ती व्हॅन वरळीच्या सिमेन्स फॅक्टरीबाहेर सोडून पळ काढला...आणि शेवटी हीच व्हॅन या संपूर्ण खटल्याची उकल करण्यात महत्वाची भूमिका बजावून गेली.


४८ तासानंतरही स्फोटाच्या सूत्रधाराचा सुगावा लागत नसल्याने पोलिसांवर खुप दबाव होता. एव्हाना वरळीला सापडलेली स्फोटके भरलेली ती व्हॅन कुणा रुबिना सुलेमान मेमन नामक महिलेल्या नावे असल्याची माहिती आरटीओतून मिळाली. या महिलेचा पत्ता अल हुसैनी बिल्डींग, माहिम असा होता. स्थानिक उपायुक्त राकेश मारिया पथकासह या सात मजली इमारतीत पोहोचले.  तिथूनच जाणाऱ्या एका वृद्ध इसमाला त्यांनी विचारले असता मेमन कुटुंब पाचव्या मजल्यावर राहत असल्याचे समजले. मेमन कुटुंबियांच्या दोन्ही घरांना कुलूप होते. आजूबाजूला चौकशी केली असता दोन तीन दिवसांपुर्वीच घरातील सर्व परदेशी गेल्याची माहिती मिळाली. तसेच कार ज्या रुबिना नामक महिलेच्या नावे होती, तिच्या दिराचे नाव मुश्ताक मेमन असून तो बॉम्बस्फोटाच्या दिवशी सकाळीच दुबईला निघून गेल्याचेही कळले. या माहितीने राकेश मारियांच्या मनात संशयाची पाल चुकचूकली. मुश्ताक मेमन उर्फ टायगर मेमन हा सोने चांदी तस्कर असून पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याची माहिती मारियांसोबत आलेल्या स्थानिक पोलीस अधिकारी माणेकशा यांनी दिली. मारियांनी फ्लॅट्सची झडती घेण्याचा निर्णय घेतला. झडतीदरम्यान एका कपाटाच्या ड्रॉव्हरमधून स्कूटरची एक किल्ली सापडली. ही किल्ली कदाचित त्याच स्कूटरची असावी, जी दादरच्या नायगाव येथे स्फोटके भरलेल्या अवस्थेत सापडली होती, असा विचार मारियांच्या मनात आला. आपल्या पथकातील डांगळे नावाच्या एका अधिकाऱ्याला त्यांनी ती किल्ली घेऊन माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये जप्त करून ठेवलेल्या त्या स्कूटरला लागते का ते पाहून येण्याचे आदेश दिले. 

 

बेवारस  स्कुटरच्या चावीने दिली पोलिसांना दिशा
संशयित अाराेपी मेमन राहात असलेल्या इमारतीची माहिती मिळाल्यानंतर पाेलिस उपायुक्त राकेश मारिया यांनी तिथेच अापल्या तपासाची दिशा वळवली. तेथील एका घरात जाऊन त्यांनी शेजाऱ्यांकडून काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. बोलता बोलता मारिया यांनी टायगर मेमनच्या एका व्यवस्थापकाचे नाव आणि त्याचा पत्ता अशी बरीच माहिती मिळवली. तेवढ्यात डांगळे परत आले आणि टायगरच्या घरात सापडलेली किल्ली त्याच बेवारस स्कूटरची असल्याची बाब त्यांनी मारियांच्या कानावर घातली. आणि हाच या गुन्ह्याची संपूर्ण उकल होण्याच्या मार्गातील पहिला महत्वाचा दुवा ठरला. त्यानंतर असगर मुकादम या टायगर मेमनच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्या चौकशीतून टायगर मेमन हाच या भीषण बॉम्बस्फोटाचा सूत्रधार असल्यावर शिक्कामोर्तब झाले.

बातम्या आणखी आहेत...