आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एडीआरचा अहवाल: सात पक्षांना 589 कोटी देणगी, एकट्या भाजपलाच 532 कोटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - २०१६-१७ मध्ये देशातील देणगीदारांनी राजकीय पक्षांना ५८९.३८ कोटींचा निधी दिला. गेल्या वर्षीपेक्षा यंदा यात ४८७ टक्क्यांनी वाढ झाली. यापैकी ५३२.२७ कोटी एकट्या भाजपला मिळाले असून २०१५-१६ च्या तुलनेत ही ५९३ टक्क्यांची वाढ आहे. काँग्रेसला फक्त ४१.९० कोटी मिळाले. प्रमुख ७ राजकीय पक्षांनी सादर केलेल्या ताळेबंदानुसार राष्ट्रीय पक्षांची एकूण जमा १५५९.१७ कोटी रुपये आहे.   


२० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मिळालेल्या देणग्यांचा अभ्यास करणारा अहवाल असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने गुरुवारी सादर केला. प्राप्तिकर कायद्यानुसार, पक्षांना २० हजारांपेक्षा कमी देणग्यांची माहिती उपलब्ध न करून देण्याची मुभा आहे. त्यापेक्षा जास्त देणगीचीच माहिती भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, सीपीआय, सीपीएम, बसप आणि तृणमूल काँग्रेसने दिली आहे. एडीआरच्या अहवालानुसार गेल्या वर्षी २१२३ देणगीदारांनी ५८९.३८ कोटींची देणगी दिली होती.

 

भाजपला ११९४ देणगीदारांकडून ५३२.२७ कोटी तर, काँग्रेसला ५९९ देणगीदारांकडून ४१.९० कोटी मिळाले आहेत. अन्य पक्षांपेक्षा भाजपला मिळालेली देणगी नऊ पट जास्त आहे. बसपने गेल्या अकरा वर्षांप्रमाणे २०१६-१७ मध्येही २० हजार रुपयांपेक्षा जास्त देणगी मिळाली नसल्याचे प्रतिज्ञापत्र आयोगाला सादर केले. राष्ट्रवादी ६.३४, सीपीएम ५.२५, तृणमूल काँग्रेस २.१५ आणि सीपीआयला १.४४ कोटी रुपये मिळाले आहेत.  


अज्ञातांंकडून देणगी मोठी राजकीय पक्षांना अज्ञात स्रोतांपासून झालेल्या देणग्यांतही वाढ झाली आहे. भाजपला ४६४.९४ कोटींपैकी ९९.९८ टक्के (४६४.८४ कोटी) हे स्वेच्छा योगदानामधून तर काँग्रेसला १२६.१२ कोटी अज्ञात स्रोतांनी दिले आहेत. यापैकी ९१.६९ टक्के (११५.६४ कोटी)कूपन विक्रीतून मिळाले. या ७ पक्षांना दिल्लीतून २९०.९०, महाराष्ट्रातून ११२.३१ व उत्तर प्रदेशमधून २०.२२ कोटी रुपयांचे दान मिळाले. कंपन्यांनी राजकीय पक्षांना रोख रक्कम म्हणून दान दिल्यास त्यांना सूट मिळणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असल्याने २०१६-१७ मध्ये फक्त १०१ देणगीदारांनी ५२.५७ लाख रुपये रोख स्वरूपात दिले. यात सीपीआयला सगळ्यात जास्त म्हणजे २२.६१ लाख १० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून मिळालेले आहेत.  

 

* २०१६-१७ आर्थिक वर्षात ५८९.३८ कोटींपैकी भाजपच्या खात्यात ५३२.२७ कोटी 
* सात राष्ट्रीय पक्षांना २१२३ देणगीदारांनी दिली देणगी

 

कॉर्पोरेट कंपन्यांनी दिले ५६३ कोटी  
राजकीय पक्षांना ७०८ काॅर्पोेरेट कंपन्यांकडून २०१६-१७ या आर्थिक वर्षात एकूण ५६३.२४ कोटी रुपये मिळालेले आहेत. भाजपला ५३१ काॅर्पोरेट कंपन्यांकडून ५१५.४३ कोटी तर काँग्रेसला ९८ काॅर्पोरेट कंपन्यांकडून ३६.०६ कोटी रुपये मिळालेले आहेत. सत्या इलेक्ट्रोल ट्रस्टने भाजप आणि काँग्रेसला २६५.१२ कोटी रुपयांचे दान केले असून राजकीय पक्षांना दान देणाऱ्यांत ही कंपनी प्रथम क्रमांकावर आहे.. या कंपनीने भाजपला २५१.२२ कोटी आणि काँग्रेसला १३.९० कोटी रुपये दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला सगळ्यात जास्त रक्कम बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी लिमिटेडने दिली असून ही रक्कम दोन कोटी रुपये आहे, तर ए. एन. एंटरप्रायजेसने राष्ट्रवादीला १.१० कोटी रुपयांचे दान दिलेले आहे. 

 

राष्ट्रीय पक्षांच्या देणगीत ४७८% वाढ  
२०१५-१६ च्या तुलनेत राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या १०२.०२ कोटी रुपयांच्या देणगीच्या तुलनेत २०१६-१७ मध्ये तब्बल ४७८ टक्क्यांनी वाढ झाली असून ४८७.३६ कोटींचे दान मिळालेले आहे.  तृणमूल काँग्रेसच्या देणगीमध्ये २०१५-१६ पेक्षा २३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर सीपीएम आणि काँग्रेसच्या देणगीमध्ये अनुक्रमे १९० आणि १०५ टक्के वाढ झाली आहे.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...