आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपकडून आता राज्यसभेची ऑफर- नारायण राणे, 2019 नंतर केंद्रात जाण्याची इच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बुधवारी रात्री भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजपकडून राज्यसभेची ऑफर दिल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच मंत्रिपदाबाबतही अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांकडे विचारणा केल्याचे सांगत २०१९ नंतर दिल्लीत जाण्याची इच्छाही राणे यांनी बोलून दाखवली.

 

काँग्रेस सोडल्यानंतर नारायण राणे यांनी स्वतःचा वेगळा पक्ष काढून एनडीएला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात घेतले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. परंतु सहा महिने झाले तरी नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश झालेला नाही. याबाबत नारायण राणे यांनी वेळोवेळी नाराजीही व्यक्त केली होती. मात्र, बुधवारी दिल्लीला अमित शहा यांच्याशी बैठक झाल्यानंतर राणे काहीसे निश्चिंत झाल्याचे दिसत होते. राणे म्हणाले, भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी भेटीसाठी बोलावल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यानंतर मी दिल्लीला गेलो. मुख्यमंत्रीही तेथेच होते. माझ्या मंत्रिपदाबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारत म्हटले की, मंत्रिपद मिळण्यास उशीर होत असल्याने तुम्हाला राज्यसभेवर जायचे आहे का? महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे २०१९ नंतर दिल्लीला जाण्याचा विचार आहे असेही राणेंनी सांगितले.


मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळत नाहीत यामागे काय कारण असावे, असे विचारता राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यापुढे काही अडचणी आहेत, त्या दूर करत आहे. त्यानंतर लगेचच तुम्हाला मंत्री बनवले जाईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळेल, हे नक्की. भाजपने जे आश्वासन दिले आहे ते पूर्ण केले जाईल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ते पूर्ण करावे, असे शहा यांनी त्यांना स्पष्ट सांगितले, असेही राणे म्हणाले.

 

भाजपच्या कोट्यातून ३ जागा
अमित शहा यांच्या भेटीनंतर गुरुवारी राज्यसभेसाठी राणे यांचे नाव नक्की झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्राच्या कोट्यातून ३ जागा भाजप निवडून आणू शकतो. त्यामुळे एका जागेसाठी प्रकाश जावडेकर आणि दुसऱ्या जागेसाठी राणे यांचे नाव नक्की झाल्याचे समजते. मात्र, राणे ७ मार्चला निर्णय घेतील.

बातम्या आणखी आहेत...