आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांची महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण, राज्य पुनर्वसन व संनियंत्रण समितीच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. या पदाला मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला असून मदत व पुनर्वसनमंत्री यांनी भंडारी यांच्या नावाची शिफारस केल्याने त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
महसूल व वन विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण, संनियंत्रण समिती आणि राज्य संनियंत्रण समिती या तिन्ही आस्थापनांचे एकत्रीकरण करून यंत्रणेची पुनर्रचना करण्यात आली आहे. या पुनर्रचनेदरम्यान उपाध्यक्षपद निर्माण करण्यात आले असून भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळवून देण्याची जबाबदारी या नव्या प्राधिकरणावर असणार आहे.
मदत व पुनर्वसनमंत्र्यांनी नामनिर्देशित केल्यानंतर या प्रस्तावाला १८ एप्रिल रोजी वित्त विभागाने मंजुरी दिली असून शुक्रवारी या नियुक्तीबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शासकीय समारंभाच्या वेळी मंत्र्यांच्या खालोखाल त्यांचे स्थान असणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे भंडारी यांना दिलासा मिळाला आहे.
भंडारींच्या नाराजीची भाजपने अखेर घेतली दखल
माधव भंडारी यांनी दहा वर्षांपेक्षा अधिक काळ प्रदेश भाजपचे प्रवक्तेपद सांभाळले असून भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांना आमदारकीची संधी मिळेल, अशी शक्यता होती. यापूर्वी दोन-चार वेळा झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या संभाव्य उमेदवारांमध्ये त्यांचे नाव चर्चेत येत असे. मात्र, प्रत्येक वेळी या ना त्या कारणाने त्यांचे नाव वगळण्यात आले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरू होती. अखेर या पदावर त्यांची नियुक्ती करत पक्षश्रेष्ठींनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.