आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या विजया रहाटकर माघार घेणार, सावध काँग्रेस- राष्ट्रवादीकडून मतांची जुळवाजुळव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपच्या चौथ्या उमेदवार विजया रहाटकर या आपला उमेदवारी अर्ज माघार घेणार आहेत. - Divya Marathi
भाजपच्या चौथ्या उमेदवार विजया रहाटकर या आपला उमेदवारी अर्ज माघार घेणार आहेत.

मुंबई- राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत रंगत निर्माण होणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, आता भाजपच्या चौथ्या उमेदवार असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या आपली उमेदवारी माघार घेणार असल्याचे कळते. दरम्यान, भाजपच्या प्रकाश जावडेकर, नारायण राणे व व्ही. मुरलीधरन यांच्यासह शिवसेनेचे अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण आणि काँग्रेस उमेदवार कुमार केतकर यांचे अर्ज वैध ठरले आहेत. सोबतच भाजपने चौथा उमेदवार दिल्याने सावध झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने आमदारांच्या मतांची जुळवाजुळवा करण्यास सुरूवात केली आहे व त्यात त्यांना यशही आले आहे. त्यामुळे भाजपच्या चौथ्या उमेदवार विजया रहाटकर गुरूवारी आपला अर्ज माघारी घेणार असल्याचे कळते.

 

राज्यातील सहा जागांसाठी विधानसभेचे सदस्य मतदान करतात. यंदा सहा जागांसाठी प्रत्येक उमेदवाराला किमान 42 मतांची गरज असणार आहे. मात्र, सध्या राष्ट्रवादीकडे विधानसभेत 41 आमदार आहेत तर, काँग्रेसचेही 42 आमदार आहेत. मात्र, नुकतेच पतंगराव कदम यांचे निधन झाले. त्यामुळे ही संख्या 41 वर पोहचली आहे. नितेश राणे व कालिदास कोळंबकर हे काँग्रेसचे आमदार असले तरी राणे समर्थक असल्याने ती काँग्रेस उमेदवाराला मतदान करतील याबाबत शंका आहे. 

 

राष्ट्रवादीचे आमदार व अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील आरोपी रमेश कदम राष्ट्रवादीतून निलंबित आहेत. सोबतच त्यांनी भाजपशी जवळिक वाढवली आहे त्यामुळे त्यांचे मत राष्ट्रवादीला मिळणार नाही हे पक्षाने गृहित धरले आहे. ज्येष्ठ आमदार छगन भुजबळ यांची प्रकृतीस्वास्थ पाहता ते मतदानाला येतील की नाही हे स्पष्ट नाही. अशा परिस्थितीत काँग्रेससह राष्ट्रवादीला तीन-तीन मते कमी पडत आहेत. मात्र, भाजपने चौथा उमेदवार देताच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतृत्त्व सावध झाले. त्यानंतर या दोन्ही पक्षांनी समविचारी पक्षांच्या आमदारांशी संपर्क साधला आहे. त्यानुसार शेकापच्या तीन, सपाचे अबु आझमी यांच्यासह काही अपक्षांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मतदान करण्याचे निश्चित केले आहे. भाजपचे नाराज आमदार आशिष देशमुख हे सुद्धा काँग्रेसला मतदान करणार असल्याची चर्चा आहे.

 

राणे समर्थक दोन आमदारांची मते केतकरांनाच?-

 

दरम्यान, नारायण राणे यांचे दोन समर्थक आमदार नितेश राणे व कालिदास कोळंबकर हे काँग्रेसचे उमेदवार कुमार केतकर यांनाच मतदान करण्याची शक्यता आहे. मूळात हे दोनही आमदार काँग्रेसचे आहेत. सोबतच नारायण राणे यांचे कुमार केतकर यांच्याशी सलोख्याचे संबंध राहिले आहेत. त्यामुळे राणे आपल्या मुलाला व समर्थक कोळंबकर यांना केतकर यांनाच मतदान करा असे सांगू शकतात. तसेही इच्छा नसताना राणेंना राज्यसभेवर जावे लागत आहेत. त्यामुळे ते भाजपला मनापासून मदत करण्याच्या मूडमध्ये राणे नाहीत, अशी चर्चा आहे. सोबतच काँग्रेसने राणे समर्थकांची दोन मते सोडून राज्यसभेच्या विजयाची जुळवाजुळव केल्याने काँग्रेस निश्चिंत आहे. 

 

विधानसभेतील असे आहे संख्याबळ-

 

भाजप व मित्रपक्ष- 122
शिवसेना- 63
काँग्रेस- 41
राष्ट्रवादी- 41
शेकाप 3
बहुजन विकास आघाडी-3
एमआयएम – 2
मनसे – 1
सपा – 1
भारीप – 1
माकप – 1 
अपक्ष-7

 

पुढे वाचा, राणे व केतकरांच्या संबंधाबाबत अधिक माहिती.....

बातम्या आणखी आहेत...