आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: ‘देवा’ चित्रपटाला दररोज मिळाले 225 खेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अभिनेता सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचेच जास्त खेळ लावावेत यासाठी सिंगल स्क्रीन व मल्टिप्लेक्स चालकांवर दबाव आणणाऱ्या यशराज फिल्म्सला  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या इशाऱ्यापुढे अखेर नमावे लागले.  शुक्रवारी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाबरोबरच प्रदर्शित झालेल्या दोन मराठी चित्रपटांपैकी ‘देवा’ या चित्रपटाला रोज २२५ शो व ‘गच्ची’ या चित्रपटाला सुमारे १०० शो मिळाले आहेत.    


यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले, मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे मिळावीत म्हणून महाराष्ट्रातच आंदोलनाचा इशारा द्यावा लागतो ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कायद्यातील तरतुदीनुसार प्राइम टाइम व अन्य वेळीही मराठी चित्रपटांना पुरेसे खेळ व चित्रपटगृहे मिळायला हवीत. जे या कायद्याचे उल्लंघन करतील त्या चित्रपटगृहांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. यशराज फिल्म्सने आमच्या इशाऱ्याची तातडीने दखल घेतली. त्यामुळेच ‘देवा’ व ‘गच्ची’ या मराठी चित्रपटांना पुरेसे खेळ व चित्रपटगृहे मिळाली आहेत. 


यशराज फिल्म्स असो वा अन्य कुठलीही संस्था - त्यांनी यापुढे मराठी चित्रपटांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तर तो प्रकार मनसे अजिबात खपवून घेणार नाही, असेही खोपकर यांनी सांगितले. दरम्यान, याआधीही मराठी चित्रपटांसाठी मनसेने अनेकदा पुढाकार घेतला होता. मात्र, यातील काहीच चित्रपट चांगला व्यवसाय करतात. त्यामुळे चांगल्या चित्रपटांचे समर्थन मनसे करावे, असा सूरही निघत आहे.


‘गच्ची’, ‘देवा’कडे प्रेक्षकांची पाठ    
मोठे हिंदी चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित होणार असतील त्या दिवशी चित्रपट प्रदर्शित न करता महत्त्वाचे मराठी चित्रपट आपले प्रदर्शन एक-दोन आठवडे पुढे ढकलत असत. तसा आजवरचा इतिहास होता. परंतु ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटासमोर ठामपणे उभे राहून ‘देवा’ व ‘गच्ची’ या महत्त्वाच्या मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांनी शुक्रवारी आपले चित्रपट प्रदर्शित केले. हिंदी चित्रपटांसमोर ठामपणे पाय रोवून उभे राहण्याची घटना मराठी चित्रपटांबाबत खूप दिवसांनी घडली आहे. मात्र, ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी जितका प्रचंड प्रतिसाद दिला आहे तितका ‘गच्ची’ व ‘देवा’ या मराठी चित्रपटांना मिळालेला नाही हीदेखील वस्तुस्थिती आहे.

बातम्या आणखी आहेत...