आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षवेधीसाठी लाच: धनंजय मुंडे यांचे नाव घेतल्याने चॅनलविरुद्ध हक्कभंग; विधिमंडळात खळबळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एका मराठी वृत्तवाहिनीने बुधवारी सायंकाळी गौप्यस्फोट करत असल्याचा दावा करून विधिमंडळात लक्षवेधी सूचना चर्चेला येऊ नये म्हणून पैसे द्यावे लागत असल्याचा संदर्भ असलेली ध्वनिफीत ऐकवली. गुरुवारी विधिमंडळात यामुळे प्रचंड खळबळ उडाली. विशेष म्हणजे ध्वनिफितीमध्ये एका संदर्भात धनंजय मुंडे यांचे नाव आल्याचे ऐकवण्यात आल्याने मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी लावून धरली. दरम्यान, विधान परिषदेत या वृत्तवाहिनीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विशेष हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला. सभापती रामराजे निंबाळकर यांनी प्रस्ताव स्वीकारून तो विशेषाधिकार हक्कभंग समितीकडे पाठवत अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.


विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर गोंधळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. विधान परिषदेत भाजपचे प्रवीण दरेकर यांनी 

अाैचित्याच्या मुद्याद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. यावर मुंडे यांच्या बाजूने भाजप वगळता इतर सर्व पक्षाचे सदस्य एकत्र आले आणि कोणतीही शहानिशा न करता वृत्त प्रसिध्द करणाऱ्या माध्यमावर कारवाई करा, अशी मागणी केली.


शेकापचे जयंत पाटील, शरद रणपिसे, शिवसेनेचे अनिल परब, निलम गोऱ्हे, कपिल पाटील, आ.जोगेंद्र कवाडे, सौ. विद्या चव्हाण,आमदार अमरसिंह पंडित या सदस्यांनी विधिमंडळावर आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपावर भाष्य करताना तीव्र नाराजी व्यक्त केली. वृत्तवाहिन्या टीआरपी वाढवण्यासाठी सत्यता पडताळून न पाहता काहीही दाखवत असल्याचा असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला.

 

लक्षवेधी सभागृहात सादर होऊ नये म्हणून ५ लाख देण्याची भाषा... 

या वादग्रस्त ऑडिओ क्लिपमध्ये एचडीआयएलचे एमडी प्रमोद पुरंदे, शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे आणि मध्यस्थ प्रमोद दळवी यांचे संभाषण असून यात लक्षवेधी सभागृहात सादर होऊ नये म्हणून ५ लाख रुपये देण्यासंबंधी संवाद आहे. यात एके िठकाणी धनंजय मुंडे यांना पैसे द्यावे लागतील, असा संदर्भ आला आहे. त्यावरून हे रणकंदन माजले.


पीएने लाच मागितल्याची क्लिप...

धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्र्यांचे पीए कुलकर्णी यांनी एका कामासाठी ५० लाखाची लाच मागितल्याच्या संभाषणाची क्लिपही सभागृहात सादर केली. तर धनंजय गावडे, प्रमोद दळवी आणि वृत्तवाहिनीच्या संपादकांची नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मागणी केली.


आजचा हा काळा दिवस

सभागृहाच्या कामकाजाबद्दल आणि विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा आजचा काळा दिवस होता.सीतेला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागले होते तशी विरोधी पक्षनेते म्हणून आता ही परीक्षा द्यावी लागत आहे, असे सुनील तटकरे म्हणाले.


नियम करण्याची गरज : विनोद तावडे 

आज या प्रकरणामुळे एक सर्वंकष विचार करून असे आरोप केल्यानंतर त्याबाबत करावयाच्या कारवाईसाठी नियम तयार करण्याची आवश्यकता असल्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. तुमच्यावर आरोप झाले म्हणून तुम्ही रोज एका मंत्र्याची सीडी बाहेर काढू म्हणता, ते योग्य नाही. आमच्यावरही आरोप झाले. आरोप सर्वांवरच होतात; परंतु आपण ते वैयक्तिक घेत नाही, असेदेखील विनाेद तावडे म्हणाले.

 

विधिमंडळाची बदनामी : धनंजय मुंडे
धनंजय मुंडे यांनी आपल्याला लक्ष्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली. हा आरोप विधिमंडळाची बदनामी करणारा असल्याने सभागृहानेच आवाज उठवायला हवा, असे मुंडे म्हणाले. ग्रामविकास मंत्र्यांच्या पीएने ५५ लाख लाच मागितल्यासंबंधी एक क्लिपही त्यांनी सादर केली.

 

पोलिसांत तक्रार केलीय : पंकजा मुंडे
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पीएवर झालेल्या आरोपाबाबत बोलताना माझे पीए कुलकर्णी यांनी खोटी ऑडिअो क्लिप प्रसारित केल्याबद्दल पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. मी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून चौकशीची मागणी केली आहे, असे सांगितले. 

 

हक्कभंग प्रस्तावात आहे काय?

निराधार, अवमानकारक व विशेषाधिकाराचा भंग करणारे वृत्त बेजबाबदारपणे प्रसारित केल्याबद्दल आमदार हेमंत टकले यांनी विशेषाधिकाराचा भंग केल्याचा प्रस्ताव दाखल केला. यात संबंधित वृत्तवाहिनीचे मालक, संपादक, वृत्तसंपादक, वृत्तनिवेदक, संबंधित वार्ताहर आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद पुरंदरे यांच्यावर आरोप आहेत.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, धनंजय मुंडे यांच्‍या राजीनाम्‍याची मागणी... 

बातम्या आणखी आहेत...