आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छिंदमच्या वक्तव्यावरून विधान परिषदेत गदाराेळ; शेकापचे जयंत पाटील यांची सरकारवर टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद शेरेबाजी करणारा अहमदनगरचा भाजपचा तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदमच्या वक्तव्याचे विधान परिषदेच्या सभागृहात बुधवारी पुन्हा पडसाद उमटले. 


अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना शेकापचे सदस्य जयंत पाटील यांनी छिंदमच्या वादग्रस्त वक्तव्याचा सत्ताधारी मंडळींनी साधा निषेध केला नाही, अशी टीका केल्यानंतर जयंत पाटील अाणि मेटे यांच्यात शाब्दिक वाद झाला त्यामुळे तालिका सभापती चंद्रकांत रघुवंशी यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सातत्याने गजर करणाऱ्या राज्यातील सत्ताधारी भाजप, शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी अहमदनगरचा तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदमच्या वक्तव्याचा साधा निषेधसुद्धा केला नाही, अशी टीका शेकापचे पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. त्यास भाजपचे विनायक मेटे यांनी आक्षेप घेतला. घटना घडली त्याच दिवशी आपण त्याचा तातडीने निषेध केला, असे मेटे यांचे म्हणणे होते. त्यास विरोधकांनी हरकत घेतली. सत्ताधारी पक्षाचा एकही माणूस त्याविरोधात बोलला नाही, असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निदर्शनास आणले.  यावर सभागृह नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, विरोधी सदस्यांकडून सभागृहात हा विषय वारंवार आणला जातो. ही घटना घडल्यानंतर दुसऱ्याच क्षणाला भाजपमधून श्रीपाद छिंदमची हकालपट्टी करण्यात आली. त्याला उपमहापौरपदाचा राजीनामा देण्यास सांगितले. छिंदमला कुठे आम्ही संरक्षण दिले, असा सवाल करून, त्याच्याविरोधात सर्व कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...