आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- औरंगाबादचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली. मिटमिटा येथे कचराविरोधी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांना घरात घुसून पोलिसांनी मारहाण केली होती. या प्रकरणाची महिनाभरात गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव व पोलिस महासंचालक यांच्या समितीमार्फत चौकशी केली जाईल, समितीच्या शिफारशीनुसार पुढील कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. स्थानिक नागरिकांवरील गुन्हे मागे घेऊ. मात्र पोलिसांना मारहाण केल्याबद्दल दाखल गुन्हे मागे घेतले जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कचरा प्रकल्पासाठी ८६ काेटी
अाैरंगाबादच्या कचरा प्रश्नावर स्थायी तोडगा, घनकचरा व्यवस्थापनातून कचरा विल्हेवाटीसाठी ८६ काेटींचा निधी मंजूर करताना केंद्राकडून ३० काेटी, राज्य सरकारकडून २० काेटी व मनपाकडून ३६ काेटी रुपये असा निधी लागणार अाहे. तथापि मनपाची अार्थिक स्थिती पाहता महापालिकेचा हिस्सा राज्य सरकारच देणार अाहे. राज्यात ४८ शहरांचे घनकचरा प्रकल्प अहवाल ३१ मार्चपूर्वी मंजूर केले जातील, असेही ते म्हणाले.
१९९९मध्येही झाली होती अशी कारवाई
१९ वर्षांपूर्वी ६ डिसेंबर १९९९ ला आयुक्तालयात दंगलीनंतर पत्रकार व नागरिकांवर लाठीमार झाला होता. तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी तेव्हा पोलिस आयुक्त श्रीपाद कुलकर्णी यांना ७ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले होते.
आता परत येण्यात रस नाही : यादव
सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले पोलिस आयुक्त यादव यांनी आता औरंगाबादेत परत येण्यात रस नसल्याचे संकेत पत्रकारांशी बोलताना दिले. दरम्यान, मिलिंद भारंबे यांनी गुरुवारी रात्री शहर पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. हा कार्यभार स्विकारत असताना यशस्वी यादव मात्र अनुपस्थित होते.
दोन्ही आयुक्तांना हटवा
राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी आंदोलकांवरील लाठीमार ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना असल्याचे सांगत पोलिस व महापालिका आयुक्तांना पदावरून दूर करावे, अशी मागणी सभागृहात केली.
परदेश वाऱ्याही अडचणीत
कचरा प्रश्नावर विदेशात अभ्यास सहलीवर गेलेल्या महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी लक्षात घेत तशी तयारी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दर्शवली. चर्चेत संजय शिरसाट, राजेश क्षीरसागर, अतुल सावे यांनीही मुद्दे मांडले.
रजेवर पाठविण्यापूर्वी यशस्वी यादव यांचा ‘इतिहास’ देखील तपासला गेला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय विधीमंडळात जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी विविध स्तरातून पूर्ण माहिती घेतली. त्यात औरंगाबादच्या तीन आमदारांसह कोल्हापूरच्या आमदारांनी सांगितलेला यादव यांचा ‘इतिहास’ देखील निर्णायक ठरला. मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार यशस्वी यादव यांनी मिटमिट्यात केलेल्या मारहाणीची माहिती आमदार शिरसाट यांनी आधी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांना व त्यानंतर मुख्यमंत्ऱ्यांना दिली. इम्तियाज जलील यांनी सांगितले की, अमितेशकुमार यांच्या काळात बंद झालेले औरंगाबादेतील सर्व काळे धंदे आता खुलेआम सुरू आहेत. गुन्हेगार मंडळी पोलिस ठाण्याचा कारभार चालवित आहेत. मिटमिटा येथे लोक आंदोलन करत असताना यादव तिकडे फिरकलेच नाहीत. दालनात बसून सगळे काही यशस्वी होईल, असे त्यांना वाटत होते. सहा महिन्यांपूर्वी बागडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात स्वत:चे भाषण होताच यादव निघून गेले. विधानसभा अध्यक्षांचा प्रोटोकॉल पाळण्याचे भानही त्यांनी ठेवले नाही. यादव पूर्वी कोल्हापूरला असताना तेथील एका महिला हवालदाराने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. पण त्यांच्यावर तेव्हा ठोस कारवाई झालीच नाही. त्यामुळे आता त्यांना पाठिशी घालू नये, असे कोल्हापूरच्या तिन्ही आमदारांनी म्हटले. अतुल सावे यांनीही मिटमिट्यात अतिरेक झाल्याचे सांगितले. आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले की, मिटमिट्यात दगडफेक सुरू असताना यशस्वी यादव प्रोझोन मॉलमधील सत्यम सिनेप्लेक्समध्ये चित्रपट पाहत होते. दोन दिवसानंतर सारे मिटमिटा गाव रात्री नऊ वाजता झोपले असताना ब्लैक कैट कमांडो घेऊन रात्री ११ वाजता ते तेथे गेले आणि लोकांना म्हणू लागले, हमसे प्यार करो, लिडरों के पास क्यों जाते हो. हे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.