आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत यशस्वी उपचार घेऊन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर भारतात परतले!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अमेरिकेत स्वादुपिंडाच्या आजारावर यशस्वी उपचार घेऊन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गुरूवारी दुपारी मुंबईत परतले. मुंबईत दाखल झाल्यानंतर ते लागलीच आपल्या स्वगृही म्हणजे गोव्याला रवाना झाले. स्वादुपिंडाच्या गंभीर आजारामुळे पर्रीकर 8 मार्चपासून न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत होते. दरम्यान मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी आपल्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. शुक्रवारी होणा-या मंत्रिमंडळ बैठकीत विधानसभा अधिवेशन घेण्याविषयी चर्चा होऊ शकते.  

 

तीन महिन्यांच्या उपचारानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गुरुवारी दुपारी 2 वाजता ते मुंबई विमानतळावर उतरले. मुंबईत काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर ते गोव्याकडे रवाना झाले. सायंकाळी 6 वाजता पणजीत दाखल झाले.      

 

14 फेब्रुवारी रोजी पोटदुखीचा त्रास जाणवल्यामुळे पर्रीकर यांना गोव्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईत लिलावती रूग्णालयात हलविण्यात आले होते. लिलावतीत आठवडाभर उपचार घेतल्यानंतर 22 फेब्रुवारी रोजी ते गोव्यात परतले. त्याच दिवशी विधानसभेत त्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.

 

त्यानंतर काही दिवस गोव्यात विश्रांती घेऊन ते पुन्हा मुंबईला उपचारासाठी गेले. तिथून 7 मार्चला ते न्यूयॉर्कला रवाना झाले. अमेरिकेत जाण्यापूर्वी गोव्यात कामकाज पाहण्यासाठी त्यांनी सुदिन ढवळीकर, विजय सरदेसाई आणि फ्रान्सिस डिसोझा या तीन मंत्र्यांची मंत्रिमंडळ सल्लागार समिती स्थापन केली होती. त्या समितीने आतापर्यंत 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाची कामे मंजूर केली आहेत. काँग्रेसने या समितीच्या कामकाजावर नाराजी वर्तवत सरकारची आणि प्रशासनाची अवस्था अर्धांगवायू झाल्याप्रमाणे झाली आहे अशी टीका केली होती.
         
भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मागील महिन्यात गोव्यात पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत पर्रीकर यांचा एक व्हिडिओ दाखविण्यात आला होता ज्यात लवकरच मायदेशात परतणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. अखेर गुरूवारी पर्रीकर भारतात दाखल झाले.

 

आमचे नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आज (बुधवारी) न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्याचे पाहून आनंदही झाला. त्यांना पुन्हा कार्यरत पाहण्यासाठी आम्ही सारे उत्सुक आहोत, अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. फडणवीस आठ दिवसाच्या कॅनडा व अमेरिका दौ-यावर आहेत. कॅनडातील दौरा संपवून सध्या ते अमेरिकेत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...