आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

27वर्षांपूर्वी चुकून भारतात आला पाकिस्तानी, मुंबईत थाटला संसार, आता मायदेशी रवानगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सुमारे २७ वर्षांपूर्वी वयाच्या दहाव्या वर्षी चुकीने भारताच्या हद्दीत घुसून आलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाची सोमवारी त्याच्या मायदेशी रवानगी करण्यात आली आहे. सिराज खान असे या व्यक्तीचे नाव असून तो मुंबईच्या अँटॉप हिल भागात वास्तव्यास होता. त्याने काही वर्षांपूर्वीच मुंबईतील साजिदा खान नामक महिलेशी विवाह करून त्याने संसारही थाटला. या दांपत्यास तीन अपत्येही आहेत.


सिराजविरोधात बेकायदेशीर भारतात येणे तसेच भारतात येऊन वास्तव्य करण्यासंबंधीत गुन्ह्याची नोंद होती. या गुन्ह्यासाठी त्याला  ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली होती. ती त्याने भोगली आहे. दरम्यान, पाकिस्तानात परत जाण्याची आशा सोडलेल्या सिराजने परराष्ट्र मंत्रालयाकडे भारतीय नागरिकत्वासाठी अर्जही केला. मात्र, त्यावर कोणताच निर्णय झाला नाही.  २०१४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या पीठाने नागरिकत्वाचा निर्णय होईपर्यंत काही दिवसांसाठी भारतात राहण्याची परवानगी दिली. दरम्यानच्या काळात न्यायालयाने त्याच्यावरील सर्व खटले रद्द केले. तर, स्थानबद्धतेच्या आदेशाचा अवमान केल्याचा खटलाही सरकारने परत घेतला. मात्र, परदेशी अधिनियमाअंतर्गत त्याची मायदेशी रवानगी करणे अपरिहार्य असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. आर. एम. सावंत आणि न्या. एस. व्ही. कोतवाल यांनी निर्वाळा दिला. त्यामुळे १० मार्च रोजी त्याला बांद्रा स्थानकावरून अमृतसरला पाठवण्यात आले. त्यानंतर १२ मार्चला अटारी सीमारेषेवर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, पत्नी साजिदाने पतीला भारतात राहू देण्यासंबंधीची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली असून त्यावर २० मार्च रोजी सुनावणी होणार आहे.  

 

आता काय पर्याय?  
पोलिसांच्या मते, सिराजला आता पाकिस्तानातून भारतात येण्यासाठी  पासपोर्ट आणि व्हिसा काढावा लागेल किंवा वैध दस्तऐवजांच्या आधारेच त्याला आपली पत्नी आणि अपत्यांना पाकिस्तानला नेता येईल. दरम्यान, सिराजची पत्नी त्याच्या भारतीय नागरिकत्वासाठी कायदेशीर लढा देत आहे. न्यायालय आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या निर्णयावरही बरेच काही अवलंबून आहे.

 

चुकून भारतात आल्याचा सिराज खानचा दावा  
१९९६ मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी पाकव्याप्त काश्मिरातील आपल्या मूळ गावातून भारतात आल्याचा सिराजचा दावा आहे. २००९ मध्ये त्याने आपल्या मूळ गावी जाण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पोलिसांनी त्याच्याकडे तो पाकिस्तानी नागरिक असल्यासंदर्भातील वैध कागदपत्रांची मागणी केली. अवैधरीत्या भारतात वास्तव्य करत असल्याप्रकरणी गुन्हे शाखेने त्याला अनेकदा अटकही केली.   

बातम्या आणखी आहेत...