आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- मोबाईल अॅपद्वारे टॅक्सी सेवा पुरविणा-या ओला आणि उबेर कंपनीद्वारे सेवा देणा-या कॅबचालकांचा दुस-या दिवशीही संप कायम आहे. सोमवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते अनिश्चित काळासाठी संपावर गेले आहेत. विविध शहरातील कॅबचालक आपापल्या शहरातील ओला- उबेरच्या ऑफिसाबाहेर आपल्या कुटुंबियांसोबत आंदोलन करत आहेत. दरम्यान, मुंबईत याचा प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. त्यातच आज सकाळी रेल्वे अप्रिंटिस प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने सकाळपासून वाहतूकीवर मोठा ताण पडला आहे.
ओला-उबेर कंपन्या आमचे आर्थिक शोषण करत आहेत. कंपनीने आम्हाला महिना 1 लाख 25 हजारांचा बिजनेस दिला जाईल असे सांगितले होते. मात्र, तसे होताना दिसत नाही. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या नेतृत्त्वाखाली या कॅबचालकांचा संप सुरू आहे. या संपात मुंबई, पुणे, बंगळुरु, दिल्ली आणि हैद्राबादमधील कॅबचालक सामील झाले आहेत. मात्र, याचे जास्त पडसाद मुंबई, बंगळुरूसह दिल्ली-गुरगाव भागात पडल्याचे सांगितले जात आहे.
काय आहेत या कॅबचालकांच्या मागण्या?
- ओला-उबेर कंपनीकडे करारबद्ध असलेल्या कॅबचालकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या उत्पन्नात सातत्याने घट होत आहे.
- कॅबचालक युनियनने अनेक मागण्या केल्या आहेत. यामध्ये पहिल्यासारखा कमीत कमी 1.25 लाखांचा व्यवसाय मिळाला पाहिजे.
- कंपनीद्वारे चालवण्यात येणा-या कॅब बंद कराव्यात जेणेकरून आम्हाला बिजनेस मिळेल. तसेच ज्या कॅबचालकांना प्रवाशांनी कमी रेटिंग दिले आहे त्यांना परत कामावर घेतले जावे.
- तसेच कार, गाडीच्या किंमतीनुसार भाडे निश्चित करण्यात यावे.
मनसे वाहतूक सेनेचे काय आहे म्हणणे-
- याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे संजय नाईक यांनी रविवारी सांगितले होते की, ज्यांनी 5 ते 7 लाख रुपये गुंतवले होते त्यांना प्रतिमहिना 1.5 लाख रुपयेपर्यंत कमाईची आशा होती.
- ओला- उबेरनेही त्यांना दरमहा सव्वा ते दीड लाख रूपये कमाई होईल असे आश्वासन दिले होते.
- पण ओला, उबेर कंपन्यांनी आपल्या स्वत:च्याच काही गाड्या सुरू केल्याने करार केलेल्या कॅबचालकांची निम्मी देखील कमाई होत नाही.
- हे सर्व ओला व उबरेच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयामुळे व इतर काही चुकीचे निर्णय घेतल्यामुळे घडत आहे.
- मुंबईमध्ये 45 हजार कॅब्स आहेत पण स्लो डाऊनमुळे व्यवसायात सध्या 20 टक्के घट झाली आहे.
कंपनी व्यवस्थान- यूनियनची चर्चा निष्फळ-
- दरम्यान, ओला, उबेर कंपन्यांचे व्यवस्थापन आणि कॅबचालकांच्या यूनियनसोबत चर्चा करत आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. त्यांच्यातील बोलणी निष्फळ ठरली आहे. - यूनियनमध्ये असलेल्या कॅबचालकांनी सोमवार सकाळपासून आपले मोबाईल अॅप (डिव्हायसेस) बंद ठेवली आहेत.
- त्यामुळे सध्या फक्त कंपनीद्वारेच चालवल्या जाणा-या कॅबच फक्त प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत पण अशा कॅबची संख्या फारच कमी आहे.
ओला- उबेरची देशातील 110 शहरांत सेवा-
- ओला कंपनी देशातील 110 शहरांमध्ये सेवा देते तर उबेर मोजक्या पण मोठ्या 25 शहरामंध्ये सेवा पुरवते.
- भारतात ओलाने रोज 20 लाख लोक प्रवास करतात, तर उबेरचा दररोज 10 लाख प्रवासी वापर करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.