आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंद्राणी मुखर्जी आता आणखी एका घटस्फोटाच्या तयारीत; पती पीटरला पाठवली नोटीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बहुचर्चित इंद्राणी मुखर्जी आणखी एका घटस्फोटाच्या तयारीत आहे. शिना बोराच्या हत्येची आरोपी असलेली इंद्राणी आता पती पीटर मुखर्जीला काडीमोड देऊ इच्छित आहे. दोघांचा १६ वर्षांचा संसार संपुष्टात आणण्यासाठी तिने पीटरला नोटीस बजावली आहे. वास्तविक, शिना बोराच्या हत्येच्या आरोपाखाली २०१५ पासून इंद्राणी मुंबईच्या भायखळा तर पीटर आर्थर रोड तुरुंगात कैदेत आहेत.

 

इंद्राणीकडून त्याचे वकील एडिथ डे यांनी स्पीड पोस्टच्या माध्यमातून घटस्फोटाची नोटीस आर्थर रोड तुरुंगात पाठवली आहे. यापूर्वी पीटरच्या हातात नोटीस देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याने ती घेण्यास नकार दिला होता. याबाबत एडिथ डे म्हणाले, “माझ्या अशिलाच्या (इंद्राणी) मते त्यांच्यात आता काहीच उरलेले नाही आणि भविष्यातही काही ठीक होण्याची आशा नाही. त्यामुळे ती वेगळी होऊ इच्छित आहे.’

 

आधीपासून निश्चित आर्थिक तडजोडीला मान्य करत पीटरने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी राजी व्हायला हवे. यात लंडन, स्पेनमधील संपत्ती, बँकेतील फिक्स डिपॉझिट आणि अन्य गुंतवणुकीतील तडजोडींचाही उल्लेख आहे. तडजोड आणि घटस्फोट झाल्यानंतर भविष्यात कोणत्याही स्थिर किंवा स्थावर मालमत्तेबाबत इंद्राणीकडून कोणताही दावा केला जाणार नाही, असेही यात नमूद केले आहे.  दरम्यान, वयाच्या १६ व्या वर्षी तिने दुप्पट वयाच्या वकिलाशी आणि त्यानंतर सिध्दार्थ दास या शिलाँगच्या व्यक्तीशी लग्न केले होते, असेही सांगितले जाते.

 

नाेटिसीबद्दल माहिती नाही : पीटरचे वकील  
पीटरचे वकील अमित गर्ग यांनी सांगितले की, अशा नोटिसीबाबत आपल्याला काही माहिती नाही. मात्र, पीटर आणि इंद्राणी यांच्यात आता काहीच संबंध उरले नाहीत. ८ नोव्हेंबर २००२ रोजी इंद्राणी आणि पीटर यांनी विशेष विवाह अधिनियमानुसार आणि १० नोव्हेंबर २००२ रोजी मुंबईच्या वरळी भागात हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न केले आहे. १९९३ मध्ये तिने संजीव खन्नाशी लग्न केले होते. 

बातम्या आणखी आहेत...