आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • 2013 नंतर प्रथमच मुंबईआधी मोसमी पावसाचे मराठवाडा विदर्भात आगमन

2013 नंतर प्रथमच मुंबईआधी मोसमी पावसाचे मराठवाडा-विदर्भात आगमन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शनिवारी मान्सूनने आगेकूच करत मुंबई गाठली. हवामान खात्यानुसार शनिवारी रात्री मान्सूनची महाराष्ट्रातील उत्तर सीमा मुंबईनगर, परभणी, यवतमाळ, ब्रह्मपुरी अशी आहे. शुक्रवारी मान्सून तळकोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्र, कर्नाटक सीमेलगतचा मराठवाड्यातील भाग व तेलंगणा सीमेलगतचा विदर्भ येथे दाखल झाला होता. पाच वर्षांपूर्वी २०१३ मध्ये मान्सून अशाच रीतीने मुंबईआधी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात आला होता. यंदा तो अशाच रीतीने मुंबईआधी मराठवाडा, विदर्भात दाखल झाला आहे.     

 
५ वर्षांपूर्वी मान्सून ४ जून रोजी तळकोकण व दक्षिण महाराष्ट्रातून राज्यात दाखल झाला होता. त्यानंतर ५ आणि ६ जून २०१३ रोजी राज्यातील मान्सूनने आगेकूच करत उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत वाटचाल केली होती. नंतर ८ जून २०१३ रोजी मान्सूनने मुंबई गाठली होती. यंदा मान्सूनची वाटचाल त्याच पद्धतीने होत आहे.  शुक्रवारी (८ जून) मान्सूनने तळकोकणात प्रवेश केला. अरबी समुद्रातील या मान्सून शाखेने दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग ओलांडत रत्नागिरीपर्यंत मुसंडी मारली आहे. तसेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह दक्षिण सोलापूर जिल्हा, मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूरचा कर्नाटक सीमेलगतचा भाग, विदर्भ व नांदेडचा तेलंगणा सीमेलगतच्या भागापर्यंत मान्सूनने आगेकूच केली होती.

 

अरबी  समुद्रातील मान्सूनच्या शाखेला बंगालच्या उपसागरातील शाखेनेही अनुकूल साथ दिल्याने मान्सूनने शनिवारी मुंबई तर गाठलीच, शिवाय मध्य महाराष्ट्रातील नगर जिल्हा, मराठवाड्यातील परभणी, तर विदर्भातील यवतमाळ व ब्रह्मपुरीपर्यंत मजल मारली. 

 

२०१३ मध्ये झाला होता सरासरीपेक्षा जास्त पाऊस 

मुंबईआधी मराठवाडा -विदर्भात आलेल्या मान्सूनने २०१३ मध्ये राज्याला भरभरून पाऊस दिला होता. त्या वेळी मराठवाड्यात सरासरीपेक्षा ६ टक्के जास्त, विदर्भात ४२ टक्के, तर मध्य महाराष्ट्रात २१ टक्के जास्त पाऊस झाला होता. यंदाही एक जून ते ९ जूनपर्यंतचा मान्सून लक्षात घेतल्यास मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत १४.६ टक्के, लातूर  १४.२ टक्के आणि नांदेड जिल्ह्यांत  ११.३ टक्के पाऊस झाला आहे.    

 

१२ जूननंतर पावसात खंड?   

मान्सूनची वाटचाल सुरू असताना १२ जूननंतर पावसात खंड पडणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. आयएमडीच्या मते १२ जूननंतर दक्षिण भारतात मान्सूनची सक्रियता मंदावण्याची शक्यता आहे, तर काही हवामानतज्ज्ञांच्या मते, १२ जूननंतर मान्सूनमध्ये मोठा खंड पडणार आहे. या संदर्भात ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले, बंगालच्या उपसागरातील मान्सूनची शाखा सक्रिय झाल्याने मराठवाडा, विदर्भात चांगला पाऊस होईल. उत्तर भारतात हवेचे दाब कमी झालेले आहेत. त्यामुळे मान्सूनमध्ये खंड न पडता तो वेगाने उत्तर भारतात आगेकूच करणार आहे. त्यामुळे मान्सूनमध्ये खंड पडण्याची शक्यता नाही.

 

पावसाने मुंबैकरांची दैना, पहिल्याच पावसात तुंबली महानगरी

शुक्रवार रात्रीपासून मुंबईत मोसमी पावसाला सुरुवात झाली आणि मान्सूनच्या या पहिल्या पावसातच शनिवारी ही महानगरी जागोजागी तुंबली. सकाळीच मध्य रेल्वेवर परिणाम झाला आणि गाड्या उशिराने धावू लागल्याने चाकरमान्यांना चांगलाच त्रास झाला.  शुक्रवार आणि शनिवारी दुपारी झालेल्या पावसाने मुंबईकरांची दैना उडवली. रविवारीही मोठ्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रात्रभर पडत असलेल्या पावसाने शनिवारी सकाळी काही काळ विश्रांती घेतली. मात्र दुपारनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला.

 

मुंबई आणि उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी अवघ्या एक तास झालेल्या पावसाने दक्षिण मुंबईतील हिंदमाता, किंग्ज सर्कलसह सायन, चुनाभट्टी परिसरात गुडघाभर पाणी तुंबले. या ठिकाणी प्रत्येक पावसात पाणी तुंबतेच. मनपाने या ठिकाणी चालू पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीत पाणी तुंबणार नाही असे सांगितले होते, परंतु एकाच तासाच्या पावसानेच येथे पाणी तुंबले.

 

अनेक भागांत कमरेपर्यंत पाणी 

 मुंबईसह उपनगरांत शनिवारी अनेक भागांत रस्त्यांवर कमरेइतके पाणी होते. ३२ विमान उड्डाणांवर परिणाम झाला. तर लोकल ट्रेन विलंबाने धावल्या. हिंदमाता भागात सर्वात जास्त पाणी होते. ठाण्यात रस्त्यावरील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून एका दुचाकीस्वार मुलीचा मृत्यू झाला.

 

मराठवाड्यात अतिवृष्टी 
शनिवारी पूर्णा मंडळात १३०, ताडकळस ९४, कातनेश्वर ६५, गंगाखेड ७०, माखणी ७०, हिंगोली तालुक्यात माळहिवरा ९०, सिरसम बुद्रुक ७१, बासंबा ९५, तर कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी मंडळात ८६ आणि नांदापूर मंडळात १०४ मिमी  पाऊस झाला. वमसत मंडळात ९०, हट्टा ८०, कुरुंदा ७५, आंबा १८०, हयातनगरमध्ये ७५ मिमी पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई ८०, घाटनांदूर ६९ व लातूर तालुक्यात तांदुळजा ६५ तर कळंब १०२, इटकूर ९७ आणि भूम तालुक्यात इट मंडळात ६९ मिमी पाऊस झाला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो

बातम्या आणखी आहेत...