आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘महामित्र’ अॅपवरील माहिती खासगी कंपनीकडे; पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘नमो’ या मोबाइल अॅपद्वारे वापरकर्त्यांची खासगी माहिती परदेशी कंपन्यांना पुरवली जात असल्यावरून केंद्रात वातावरण तापलेले असतानाच राज्यातही अशाच पद्धतीने सरकारी आशीर्वादाने सर्वसामान्यांची खासगी माहिती गोळा केली जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केला. ‘महामित्र’ मोबाइल अॅपच्या माध्यमातून वापरकर्त्यांची सर्व माहिती अनुलोम या खासगी कंपनीकडे जात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी विधानसभेत केला. या माहितीचा गैरवापर झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी केला.   


 महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘सोशल मीडिया महामित्र’ हे मोबाइल ॲप्लिकेशन १ फेब्रुवारी २०१८ रोजी सुरू केले. या मोबाइल ॲपच्या वापरकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात खासगी माहिती गोळा करण्यात येत अाहे. ही माहिती माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाकडे जाण्याऐवजी वापरकर्त्यांच्या संमतीशिवाय ‘अनुलोम’ या एका धर्मादाय संस्थेकडे पाठवली जात आहे. ‘महामित्र’ या मोबाइल ॲप्लिकेशनचा संपूर्ण डाटाबेस आणि बॅकअपचे विश्लेषण anulom.org या संकेतस्थळावर केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले .

 

‘महामित्र’वरील माहिती सुरक्षित : सरकार 
‘महामित्र’ उपक्रमात सहभागी व्यक्तीची खातरजमा होण्यासाठी अॅपमध्ये मोबाइल क्रमांक व ई-मेल पत्ता नोंदवले गेले. अन्य कोणती खासगी किंवा गोपनीय माहिती घेतली नव्हती. ही माहिती ॲपवर सुरक्षित आहे. ती खासगी संस्थेला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. ते म्हणाले, या उपक्रमात ८५ हजार लोक सहभागी झाले.  हा उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘अनुलोम’ संस्थेची मदत घेतली. मात्र, या संस्थेचे:चे मोबाइल ॲप व महामित्र ॲपचा सुतराम संबंध नाही. महामित्रचा संपूर्ण डाटा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे सुरक्षित आहे.

 

प्रकरणाची चौकशी करा : बागडे  
शासकीय मोबाइल अॅप्लिकेशन वापरकर्त्यांचा डाटा संमतीशिवाय खासगी संस्थेला दिल्याने मुख्यमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी व अनुलोम संस्थेकडील सर्व माहिती तातडीने शासकीय सर्व्हरवर वळती करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण केली आहे. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले.