आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी धास्तावले: हमीभावाने तूर खरेदीचा आज अखेरचा दिवस, 50 टक्के तूर खरेदीविना पडून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- किमान आधारभूत किमतीवर राज्यात सरकारतर्फे सुरू असलेल्या तूर खरेदीचा बुधवारी अखेरचा दिवस असून राज्यात हमी भावासाठी नोंदणी झालेली सुमारे ५० टक्के तूर अजूनही खरेदीविना पडून आहे. त्यामुळे धास्तावलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारी तूर खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत राज्य सरकारने लगोलग केंद्राकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, केंद्राने मुदत न वाढवल्यास तूर उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

 
गेल्यावर्षी अतिरिक्त तूर खरेदीमुळे अडचणीत आलेल्या राज्य सरकारने यंदा हमी भावानुसार फक्त ४४ लाख ६० हजार क्विंटल तूर खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, १८ एप्रिल रोजी केंद्राने तूर खरेदीसाठी निश्चित केलेला कालावधी संपत असून आतापर्यंत फक्त २३ लाख ५२ हजार ३८५ क्विंटल तूर खरेदी करणे शक्य झाले आहे. राज्यात अजूनही सुमारे २१ लाख क्विंटल तूर खरेदीविना पडून असल्याने तूर उत्पादक शेतकरी आणि राज्य सरकारसमोर मोठा पेचप्रसंग उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तूर खरेदीची मुदत आणखी वाढवून देण्याविषयी विनंती करणारे एक पत्र ९ एप्रिल रोजी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांना पाठवले आहे. हमी भावाने तुरीच्या खरेदीसाठी राज्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली असून निर्धारित मुदतीमध्ये तूर खरेदी होऊ शकलेली नाही. त्यामुळे नोंदणी झालेल्या सर्व तूर खरेदीस ३१ मे २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी पत्राद्वारे केली आहे. मात्र, मंगळवार दुपारपर्यंत केंद्र शासनाने मुदतवाढीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.   

 

काय आहे सद्य:स्थिती?   

राज्यातील २५ जिल्ह्यांमधील ४ लाख १४ हजार ८४४ शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी शासकीय नोंदणी केली आहे. बोनससह ५,४५० रुपये प्रतिक्विंटल इतका तुरीचा हमी भाव आहे. १ फेब्रुवारीपासून हमी भावानुसार खरेदीसाठी राज्यात १८९ ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आतापर्यंत १ लाख ८९ हजार ६४४ शेतकऱ्यांकडून सुमारे २३ लाख ५२ हजार ३८५ क्विंटल तूर खरेदी झाली असून सुमारे २ लाख २५ हजार शेतकऱ्यांकडील सुमारे २१ लाख क्विंटल तूर खरेदीविना पडून आहे.   

 

 

खरेदी रखडण्याची कारणे काय?   
गेल्या वर्षी राज्यात हमी भावाने ७६ लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली होती. मात्र भरडाईसाठीच्या निविदा प्रक्रियेतील घोळामुळे ही तूर सरकारी गोदामांमध्ये पडून आहे. त्यामुळे यंदा खरेदी केलेली तूर साठवून ठेवण्यासाठी गोदामांमध्ये जागा नसल्याने जाणीवपूर्वक तूर खरेदी रखडवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्यातच तूर खरेदीची हेक्टरी मर्यादा आणि इतर जाचक निकष यामुळे गेल्या अडीच महिन्यांमध्ये अपेक्षित खरेदी होऊ शकली नाही. शिवाय अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे चुकारेही प्रलंबित आहेत. आता केंद्राने मुदतवाढ न दिल्यास शिल्लक असलेली तूर भाव पाडून खासगी व्यापाऱ्यांना विकावी लागेल, म्हणून शेतकरी धास्तावला आहे.

बातम्या आणखी आहेत...