आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- भारिपचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा पुत्र व डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांचा पणतू ‘सुजात’ याच्या भाषणाला सोमवारी आझाद मैदानावरील उपस्थितांनी मोठी दाद दिली. सुजात याने पहिल्यांदाच जाहीर सभेशी खुला संवाद साधला. आजच्या एल्गार मार्चच्या निमित्ताने आंबेडकर घराण्याची चौथी पिढी सामाजिक संगरात उतरल्याचे स्पष्ट झाले.
एल्गार मार्चमध्ये आज अनेक नेत्यांची भाषणे झाली. त्यामध्ये सुजात एक होता. त्याचे दोन मिनिटांचे भाषण होते. पण, ते सर्वाधिक चमकदार अन् प्रभावी ठरले. अतिशय शुद्ध भाषेत आणि नम्रतेने त्याने भाषण केले. सुजात म्हणाला, ‘नव्या वर्षातल्या दोन गोष्टी घ्या. एक कोरेगाव भीमाची आणि दुसरी टाटा इन्स्टिट्यूटमधील शिष्यवृत्ती बंदची. या दोन्ही घटना तळातल्या समुदायाने व्यवस्थेला प्रश्न करू नयेत, यासाठी घडवल्या गेल्या आहेत. आपण सक्षम होऊ नये, असे षडयंत्र देशात रचले जात आहे’, असा गंभीर आरोप त्याने केला. मिलिंद एकबोटे यांना अटक झाली, तोच गुन्हा संभाजी भिडे यांनीसुद्धा केलाय. आम्ही सर्व पुरावे दिलेत. पण, दोन महिने २६ दिवस उलटूही भिडे यांची अटक जाणीवपूर्वक टाळली जात आहे, असा आरोप त्याने केला. ‘या राज्यात न्याय समान नाही. त्यामुळे आता हे सरकार बदललेच पाहिजे’, असे आवाहन त्याने उपस्थितांना केले. त्याच्या आवाहनाला उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून दादही दिली.
पुण्यातील फर्ग्युसनचा सुजात विद्यार्थी
सुजात हा पुण्यात राहतो. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्याने राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. नुकतेच त्याने चेन्नईच्या एशियन काॅलेजमधून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यक्रमात सुजात आणि त्याच्या समर्थकांनी देशविरोधी घाेषणा दिल्या होत्या, असा आरोप काॅलेजच्या प्राचार्यांनी केला होता. त्यावर सर्व स्तरांतून मोठी टीका झाली होती. त्यानंतर काॅलेजने ते पत्र मागे घेतले. तेव्हा सुजात एकदम चर्चेत आला होता.
मुंबईच्या एल्गार अांदाेलनातील क्षणचित्रे
- एल्गार मार्चचे संयोजन बौद्ध महासभेच्या समता सैनिक दलाचे शेकडो जवान करत होते.
- माेदींच्या गुजरातेतील वापी, नवसारी, सुरत येथूनही कार्यकर्ते अाले हाेेते.
- आझाद मैदानाचा परिसर निळ्या झेंड्यांनी फुलून गेला होता.
- व्यासपीठावर मोदी, पेशवाई आणि भाजपच्या धिक्काराची गाणी गायली जात होती.
- अाझाद मैदानावरील अांदाेलनाच्या व्यासपीठावर भला मोठा पेशवेकालीन भगवा ध्वज लावला होता, त्यावर ‘महार योद्धा’ अशी अक्षरे होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.