आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे पाचवे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची आज (जन्म- 12 मार्च 1913) जयंती आहे. महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर ज्यांचा प्रभाव होता असे ते राजकारणी होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यासोबतच सामाजिक कार्य आणि साधी राहाणी हे त्यांचे वैशिष्टय होते. भारताच्या उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचले असले तरी सामान्य माणसाशी त्यांची नाळ जोडलेली होती. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक तरुणांमधील नेतृत्वगुण व धडाडी ओळखून त्यांना पुढे आणले. यातील एक नाव म्हणजे शरद पवार. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे यशवंतरावांना राजकीय गुरु मानतात.
यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी कराड येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. बालपणीच त्यांचे पितृछत्र हरपले. त्यांची आई आणि काका यांनी त्यांचा सांभाळ केला. यशवंतरावांना आईकडूनच आत्मनिर्भरता आणि देशभक्तीची शिकवण मिळाली होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण कराड येथे झाले. त्यांनी उच्च शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे घेतले आणि बी.ए., एलएल. बी. झाले.
1930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली, तेव्हा त्यामध्ये त्यांनी भाग घेतला. 1932 साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. या कारावासात मार्क्सवादाशी आणि मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांशी त्यांचा परिचय झाला आणि त्यामुळे काँग्रेसमधील रॉयपंथीय गटाशी त्यांचे संबंध वाढले.
दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या वेळी यशवंतराव चव्हाणांना रॉय यांनी घेतलेली युद्धविषयक भूमिका अमान्य झाली व ते काँग्रेसमध्येच राहिले व 1942 च्या छोडो भारत आंदोलनात सामील झाले. सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. यातून पुढे प्रतिसरकार स्थापन झाले, पण त्यावेळी ते तुरुंगात होते; त्यामुळे प्रतिसरकारशी त्यांचा तसा फारसा संबंध राहिला नव्हता. 1946 साली तेव्हाच्या मुंबई प्रांताच्या विधिमंडळाची निवडणूक होऊन यशवंतराव दक्षिण सातारा मतदार संघातून निवडले गेले आणि संसदीय चिटणीस झाले.
1948 साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली व 1952 च्या निवडणुकीनंतर ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री झाले. द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 1 नोव्हेंबर 1956 रोजी सूत्रे हाती घेतली. 1960 साली संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झाले व त्याचे ते पहिले मुख्यमंत्री निवडले गेले. पुढे 1962-66 या काळात ते भारताचे संरक्षणमंत्री, 1966-70 गृहमंत्री, 1970-74 पर्यंत अर्थमंत्री आणि 1974 पासून परराष्ट्रमंत्री बनले.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश....
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.