आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- राज्यातील मंत्रीच गुंडांना पोसत असल्याचा धक्कादायक अाराेप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत केला. यासंदर्भात त्यांनी ‘मंडी टोळी’ नामक एका कुख्यात टोळीचे उदाहरणही दिले. नियम २९३ अंतर्गत विरोधी पक्षांनी मांडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर ते बाेलत हाेते.
विखे म्हणाले की, एका मंत्र्याच्या शहरात ‘मंडी टोळी’ नावाची एक कुख्यात टोळी आहे. या टोळीकडे किमान ४ हजार शस्त्रे आहेत. जागा-घरे खाली करणे, खंडणी वसुली, अवैध सावकारी, सुपारी घेणे असे सर्व उद्योग ही टोळी करते. या सरकारच्या ‘कौशल्य विकास योजने’त श्याम जयस्वाल आणि बंटी जयस्वाल यांच्या या मंडी टोळीचे गुन्हेगारी ‘कौशल्य’ प्रचंड विकसित झाले आहे. आज त्या शहरात इतकी प्रचंड दहशत निर्माण झाली आहे की, त्यांच्याविरुद्ध ब्र उच्चारण्याचीही कोणाची ताकद नाही. या टोळीला राज्यातील एका मंत्र्याचाच खुला पाठिंबा आहे का, याबाबत मुख्यमंत्र्यांनी गुप्तचर विभागाकडून खातरजमा करावी, असे ते म्हणाले. मुंबई शहरालगत राहणाऱ्या एका मंत्र्यांच्या चेल्यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. खंडणी वसुली होते आहे. नगरसेवकांच्या खुनाच्या सुपाऱ्या दिल्या जात आहेत. राज्यातील मंत्रीच गुन्हेगारी टोळ्यांना पाठीशी घालत आहेत. तरीही मुख्यमंत्री त्याकडे दुर्लक्ष का करतात? अशी विचारणा विखे पाटील यांनी केली. कोरेगाव- भीमाची दंगल सरकार पुरस्कृत होती. सरकार या प्रकरणातील संशयित आरोपी मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरुजी यांना सरकार वाचवू पाहतात. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येची प्रकरणे आता थंड बस्त्यात पडली आहेत, असेही विखे म्हणाले.
चांदवडजवळील शस्त्रे काेणाची?
१४ डिसेंबर २०१८ च्या रात्री नाशिकजवळ चांदवड टोलनाक्यावर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे पकडली. या प्रकरणाचे पुढे काय झाले? एवढी मोठी शस्त्रे कोणाकडे चालली होती? या शस्त्रसाठ्याचे ‘लाभार्थी’ कोण होते? ही शस्त्रे संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या शस्त्रपूजनासाठी बोलावली होती का? अशी टीकाही विखे पाटील यांनी केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.