आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- डॉ. पतंगराव कदम हे एक प्रयत्नवादी व्यक्तिमत्त्व होते. सांगलीतील आपल्या मूळ गावातून फक्त १५ रुपये घेऊन पुण्याला आलेल्या पतंगरावांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर शिक्षणाचे विश्व उभे केले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या. विलक्षण मोकळा स्वभाव व धाडसी व्यक्तिमत्त्वाच्या पतंगरावांनी कायमच सामाजिक बांधिलकी जपत मार्गक्रमण केल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. भारती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाबद्दल मांडलेल्या शोकप्रस्तावादरम्यान ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर विरोधी पक्षनेत्यांसह अनेक ज्येष्ठ सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ. पतंगराव यांनी वडिलकीच्या नात्याने केलेले मार्गदर्शन कायमच आपल्याला बळ देऊन गेले, अशी भावना विखे पाटील यांनी व्यक्त केली. आपल्या शेजारची त्यांची मोकळी खुर्ची पाहिल्यानंतर गहिवरून येते, असे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता, तर शंभर- दीडशे वर्षे जुन्या शिक्षण संस्था असलेल्या पुण्यात १९ वर्षांचा एक तरुण येतो काय व भारती विद्यापीठाची स्थापना करतो काय हे सर्वच स्वप्नवत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांनी पतंगरावांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, पतंगराव हे जेवढे प्रभावी राजकारणी होते, तेवढेच सच्चे समाजसेवकही होते. त्यांच्या निधनाने राज्याची फार मोठी हानी झाली आहे.
बाकावरचा शेजारी गेला : चव्हाण
बाकावर माझ्या शेजारी गेली साडेतीन-चार वर्षे बसणारे पतंगराव आता या जगात नाहीत, यावर विश्वास बसत नसल्याची भावना काँग्रेसचे सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली, तर एखाद्याने किती मोठे स्वप्न पाहावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पतंगराव कदम, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते जयंत पाटील यांनी भावना व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले की, राज्यात खासगी विद्यापीठाचा कायदा अस्तित्वात नसतानाही त्यांनी विद्यापीठ उभारण्याचे पाहिलेले स्वप्न हे त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची साक्ष देते.
अशी हिंमत कुणी करणार नाही
सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनीही या शोकप्रस्तावावर बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. पतंगरावांचे अकाली जाणे ही मनाला चटका लावून जाणारी अतिशय दु:खद घटना आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सहकारातील कर्तृत्ववान व्यक्तीला महाराष्ट्र मुकल्याचे ते म्हणाले. सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, वयाच्या विशीत एखादी शाळा काढण्याची कुणी हिंमत करणार नाही, तिथे त्या वयात पतंगरावांनी थेट विद्यापीठ काढण्याचे स्वप्न पाहिले.
आदरांजलीनंतर कामकाज तहकूब
दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव नाईक, अमित देशमुख, मिणचेकर आदी सदस्यांनीही भावना व्यक्त केल्या. शोकप्रस्तावाच्या अखेरीस अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी डॉ. पतंगराव कदम यांच्या कार्यकर्तृत्वाचा धावता आढावा घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली व त्यानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.