आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजराती पाट्यांविरोधात मुंबईमध्ये मनसेचे आंदोलन; जितेंद्र आव्हाड यांनी दिला पाठिंबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो..... - Divya Marathi
फाईल फोटो.....

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्कवर आयोजित पाडवा मेळाव्यात गुजराती पाट्यांबाबत वक्तव्य केल्यानंतर मेळाव्यावरून परत जाताना मनसैनिकांनी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील गुजराती पाट्या फोडल्या. तसेच सोमवारी कांदिवली येथेही गुजराती पाट्या फोडण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांच्या गुजराती पाटयांबाबतच्या मुद्द्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी समर्थन केले आहे. 


राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अजूनही दुकाने आणि हॉटेलवर गुजराती पाट्या असल्याचा उल्लेख केला होता. तसेच मोदीमुक्त भारताची गरज असल्याचे सांगत  राम मंदिरावरून हिंदू मुस्लिम दंगे होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली होती. राज ठाकरे यांच्या या भूमिकेला राष्ट्रवादीने समर्थन दिले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ठाकरे यांच्या या भूमिकेबाबत बोलताना सांगितले, महाराष्ट्रात मराठी फलक असले पाहिजेत. मातृभाषेचा सन्मान झाला पाहिजे. राज जे बोलले ते बरोबर आहे. हिंदू-मुस्लिम लढवल्याशिवाय भाजप जिंकू शकत नाही, हे राज बोलले तेही बरोबर आहे. देश तुटला तरी चालेल पण सत्ता मिळाली पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे. राज यांची मोदीमुक्त भारत ही घोषणाही योग्य आहे, असे सांगत त्यांनी राज यांना पाठिंबा दर्शवला.


विशेष म्हणजे पाडवा मेळाव्यापूर्वी राज ठाकरे यांनी सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेटही घेतली होती. या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे राज  यांनी सांगितले असले तरी शरद पवार यांच्याशी राजकारणावर त्यांनी चर्चा केली आणि त्याचाच प्रत्यय रविवारच्या त्यांच्या भाषणात आल्याचे सांगण्यात येत आहे.

 

हेही वाचा...

 

राज ठाकरेंनी आपला स्तर पाहून बोलावे, भाषणांवर शरद पवारांचा प्रभाव; भाजप नेत्यांची टीका