आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेण्याऐवजी पावसाळी अधिवेशन घ्यावे, असा सरकारचा विचार सुरू असल्याचे संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले होते. त्यानुसार यंदाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू असून याबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात घेतला जाईल, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी या निर्णयाला पाठिंबा असल्याचे सांगितले.
याबाबत गिरीश बापट म्हणाले, हिवाळी अधिवेशनात जास्त दिवस कामकाज होत नाही. त्यामुळे नागपूरमध्ये हिवाळीऐवजी पावसाळी अधिवेशन घेण्याचा विचार आहे. मुख्यमंत्रीही पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याच्या बाजूने आहेत. नागपुरात पावसाळी अधिवेशन एक महिन्याचे घेता येऊ शकते. संसदीय कामकाज समितीच्या बैठक बैठकीत याबाबतचा निर्णय होईल. पावसाळ्यात मुंबईत खूप पाऊस असतो. रेल्वे वाहतूक खोळंबलेली असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना विधिमंडळात येण्यास अडचण होते. त्याचा परिणाम कामकाजावरही होतो.
नागपुरात एक अधिवेशन बंधनकारक : ठाकरे
नागपूर करारानुसार नागपुरात वर्षातील एक अधिवेशन घेणे बंधनकारक आहे. पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतल्यास ते जास्त काळ घेता येईल. व्यक्तिगतरीत्या माझा याला पाठिंबा आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचा विचार केला होता. परंतु तो अमलात आला नव्हता. बैठकीतच निर्णय होईल, असे माणिकराव ठाकरे म्हणाले.
पाठिंबा मिळाल्यास शक्य : विखे पाटील
सर्व पक्षांच्या नेत्यांच्या संमतीनेच संबंधित निर्णय घेतला जाईल. परंतु नागपुरात पावसाळी अधिवेशन घेण्यास काहीही हरकत नाही. मात्र, हे माझे वैयक्तिक मत आहे. अन्य पक्षांच्या नेत्यांचाही याला पाठिंबा मिळाल्यास नागपुरात पावसाळी अधिवेशन होऊ शकते, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.