आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्वाभिमानी’ कार्यकर्ते आंदोलनात असताना शेट्टी ‘यूपीए’च्या वळचणीला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘एनडीए’तून बाहेर पडलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सोमवारी दिल्लीत भेट घेतली. २०१९ च्या निवडणुकीत मोदींविरोधात सर्वपक्षीय मोट बांधण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना साथ देण्याचे संकेत या भेटीतून मिळाले. मात्र, कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता शेट्टींनी दिल्लीत गांधींची भेट घेतल्याचे समाेर अाले अाहे. भेटीचे वृत्त थेट प्रसार माध्यमांमधूनच कानावर पडल्याने ‘स्वाभिमानी’चे महाराष्ट्रातले कार्यकर्ते मात्र हादरून गेले आहेत.


 कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाल्याचे पाहून ‘यूपीए’त सहभागी होण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचा खुलासा संध्याकाळी उशिरा ‘स्वाभिमानी’कडून करण्यात आला. संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले, ‘शेट्टींनी गांधींची भेट घेतली हे खरे असले तरी यूपीएसोबत जाण्याचा निर्णय झालेला नाही. आमच्या संघटनेचे निर्णय एकट्याने घेतले जात नाहीत.’ शेट्टी- गांधी भेटीवेळी उपस्थित असणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मात्र शेट्टींचे ‘यूपीए’त स्वागत करून मोकळे झाले आहेत.


दरम्यान, विदर्भातील शेतकरी साहेबराव करपे यांनी १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली. महाराष्ट्रातली पहिली सहकुटुंब शेतकरी आत्महत्या म्हणून याकडे पाहिले जाते. या घटनेला ३१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘स्वाभिमानी’ने राज्यभरात एकदिवसीय आंदोलन केले. संघटनेचे कार्यकर्ते या आंदोलनात व्यग्र असतानाच दुपारनंतर शेट्टी-गांधी भेटीचे वृत्त समाज माध्यमे आणि प्रसार माध्यमांमधून जाहीर झाले. यावर कार्यकर्त्यांची पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया या भेटीने धक्का बसल्याची होती. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोफळे नांदेडला जाण्याच्या प्रवासात असताना ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याशी संपर्क साधला. प्रा. पोफळे म्हणाले, ‘ गांधी-शेट्टी भेटीबद्दल तपशिलाने मला सांगता येणार नाही. रात्री नांदेडला पोचल्यानंतर मी शेट्टींशी बोलेन.’  दरम्यान, स्वतः राजू शेट्टी यांनी यूपीएत जाण्याचा निर्णय अजून घेतला नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘यूपीएत जाण्याबद्दलचा निर्णय कार्यकारिणीत घ्यावा लागेल. शेतकऱ्यांना स्थिरस्थावर करण्यासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज असते. त्यासाठी सरकारवर तेवढा प्रभाव असावा लागतो. हा प्रभाव टाकण्याइतपत आमची संघटना मोठी नसल्याने दबावगट म्हणूनच आम्हाला काम करावे लागते.’

 

भेट झाली हे खरेच पण
‘राहुल गांधींना शेट्टी भेटले हे खरे आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव व कर्जमुक्तीसंदर्भातली दोन विधेयके राजू शेट्टी लोकसभेत मांडणार आहेत. या विधेयकांना कॉंग्रेसचा पाठींबा मिळवण्यासाठी ही भेट झाली. सूर्योदयानंतर सूर्यास्त होत असल्याचे नरेंद्र मोदी विसरले,’ असे शेट्टी म्हणाले असले तरी आजच्या बैठकीत यूपीएसोबत जाण्याची चर्चा झालेली नाही.’
- रविकांत तुपकर, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

 

कॉंग्रेसला शेतकऱ्यांची चिंता
‘शेतकऱ्यांच्या दुरावस्थेबद्दल काँग्रेसला चिंता वाटते. शेतकऱ्यांसाठी कोणी चांगले करत असेल तर समर्थनच करण्याची आमची भूमिका आहे.  २९ मार्चला दिल्लीत अखिल भारतीय किसान संघर्ष समितीची बैठक आहे. या बैठकीचे निमंत्रण मी राहूल गांधींना दिले. ते  किंवा काँग्रेसचे नेते बैठकीला येतील, असे त्यांनी सांगितले. इतर पक्षाच्या नेत्यांनाही आम्ही बोलवू. आमच्या राजकीय भूमिका ज्या-त्या वेळेला ठरवू.’
- खासदार राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी

 

बातम्या आणखी आहेत...