आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेसोबत युती झाली पाहिजे- नितीन गडकरी, मुख्यमंत्र्यांच्या \'साम-दाम\'वरही बोलले...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती झाली पाहिजे. भाजप-शिवसेनेची युती ही हिंदूत्त्व या विचारधारेनुसार झालेली होती. त्यामुळे आमच्यात छोटे- मोठे मतभेद, वाद झाले असले तरी दोन्ही पक्षांनी एकत्र आले पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले. मुख्यमंत्र्यांच्या पालघर निवडणुकीतील साम-दाम-दंड-भेद या वक्तव्याबाबत बोलताना       ते म्हणाले की, देवेंद्रला मी लहानपणापासून ओळखतो. तो अतिशय सभ्य व सुसंस्कृत ग्रहस्थ आहे. त्याच्या बोलण्याचा भाव वेगळा असेल. त्याला पूर्ण ताकदीने लढायचे असे म्हणायचे असेल असे मला वाटते असेही गडकरी म्हणाले.

 

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला 4 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नितीन गडकरी यांनी मंगळवारी सकाळी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि मुख्य प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते.  गडकरींनी मोदी सरकारची मागील चार वर्षातील कामगिरीचा आढावा सादर केला. यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना गडकरींनी नेहमीप्रमाणे दिलखुलास उत्तरे दिली.

 

गडकरी म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत मला प्रचंड आदर आहे. बाळासाहेब आणि प्रमोद महाजन यांनी हिंदुत्त्वाच्या विचारधारेनुसार मतांची विभाजणी नको म्हणून एकत्र युती केली. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेसोबत युती झाली पाहिजे असे माझे मत आहे. शिवसेना व आमच्यात काही मुद्यांवरून छोटे-मोठे मतभेद असले तरी हिंदुत्त्वाच्या मुद्यांवरून आम्ही एकत्र आले पाहिजे असे मला वाटते. 'तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना' सारखी आमची स्थिती झाली आहे. 

 

पालघरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साम-दाम-दंड-भेद या वक्तव्याबाबत गडकरींना छेडले असता ते म्हणाले की, देवेंद्रला मी लहानपणापासून ओळखतो. तो एक सभ्य व सुसंस्कृत ग्रहस्थ आहे. साम-दाम-दंड-भेदच्या वक्तव्य त्याने केले असले तरी त्याचा भाव वेगळा असेल. पूर्ण ताकदीने लढायचे असे त्याला म्हणायचे असेल अशी मला खात्री आहे, असे गडकरी म्हणाले.

 

माजी राष्ट्रवादी प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत याबाबत छेडले असता ते म्हणाले, विरोधी विचारधारेच्या लोकांच्या कार्यक्रमात सहभाग होणे यात काहीही वाईट नाही. जर प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणार तर सर्वांनी त्यांचे स्वागत केले पाहिजे असेही गडकरी म्हणाले. 

 

पालघरमधील ईव्हीएम घोळ व गडबडीबाबत त्यांना छेडले असता ते म्हणाले, तांत्रिक अडचणी जरूर आल्या असतील पण त्याची छेडछाड, गडबड केली असे म्हणणे योग्य नाही. यूपीमध्ये भाजप जिंकले तर गडबड आणि पंजाबमध्ये काँग्रेस जिंकली तर सर्व ठीक असे म्हणणे योग्य नाही. ईव्हीएमबाबतच्या चर्चा तथ्यहीन आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...