आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11वी पास नारायण राणे राज्यसभेच्या 7 उमेदवारांत सर्वात श्रीमंत, 88 काेटींची संपत्‍ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सात उमेदवारांमध्ये भाजपचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सर्वात श्रीमंत, तर भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष हे सर्वात ‘गरीब’ उमेदवार ठरले अाहेत. अापल्या नावे ८८ काेटींची मालमत्ता असल्याचे राणेंनी निवडणूक अायाेगाकडे दिलेल्या शपथपत्रात म्हटले अाहे.  


या निवडणुकीसाठी भाजपचे चार, तर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात अाहे. शपथपत्रातील माहितीनुसार, ६५ वर्षीय राणेंचे शिक्षण ११ वीपर्यंत झाले अाहे. त्यांच्या नावावर ९.६८ काेटींची, तर पत्नी नीलिम यांच्या नावाने १८.९८ काेटींची चल संपत्ती अाहे. तसेच ६.५३ काेटींचे हिरे व साेन्याचे दागिन्यांचेही राणे मालक अाहेत. तसेच १८.४४ काेटींचे सहा बंगले, ४.११ काेटींचे तीन फ्लॅट व ४.९३ काेटींचे तीन कमर्शियल काॅम्प्लेक्सही राणे यांच्या नावावर अाहेत.

 

राणे कुटुंबीयांच्या अाठ ठिकाणच्या शेतीची किंमत ५६.७६ काेटी, तर भूखंडांची किंमत ३.६२ काेटींवर अाहे. तसेच ४ लाख १७ हजार १२८ चाैरस फूट बिगर शेती जमिनीची किंमत ८.१९ काेटी अाहे. बँकेतील ठेवी व इतर मिळून १३.२७ काेटींचे ते मालक अाहेत. तसेच राणे कुटुंबावर २८ काेटींचे कर्ज असल्याचेही शपथपत्रात नमूद अाहे.

 

राणेंना भाजपचे सदस्यत्व दिले काय : शिवसेना

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी नेमक्या काेणत्या पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला? जर भाजपने त्यांना उमेदवारी दिली असेल तर त्यांनी भाजपचे सदस्यत्व कधी स्वीकारले? मग त्यांनी स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला का? अशा प्रश्नांची सरबत्ती शिवसेनेचे अामदार अॅड. अनिल परब यांनी केली अाहे. ‘एका पक्षाचा अध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा सदस्य होऊ शकत नाही. 

 

दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षाला एखाद्या पक्षाला उमेदवारी द्यायची असेल तर त्याला आधी अधिकृत सदस्य करून घ्यावा लागताे, तरच  त्याला संंबंधित पक्षाला बी फॉर्म देता येईल, असे नियम आहेत. त्यामुळे राणेंना भाजपने सदस्यत्व कधी दिले? जर दिले नसेल तर राज्यसभा कशी दिली?’ असा सवाल करत परब यांनी भाजप व नारायण राणे यांना काेंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

बातम्या आणखी आहेत...