आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोलनाक्यावर पिवळ्या पट्ट्याच्या ठिकाणी पथक; बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- टोल नाक्यावरील पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर असणाऱ्या वाहनांकडून टोल वसूल करण्यात येऊ नये, अशी घोषणा करण्यात आली आहे. मात्र, टाेल नाक्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची भाषा करत टाेल वसुली केली जात अाहे. या नियमाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. पट्ट्याच्या आतील व बाहेरील वाहनांचा प्रश्न निर्माण हाेऊ नये अाणि वाद टाळण्यासाठी टोल नाक्यांवर पिवळा पट्टा नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी दक्षता पथक तैनात करण्यात येर्इल, असे अाश्वासन सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिले.

  
राज्यातील टोल नाक्यांवर पिवळ्या पट्ट्याबाहेर वाहन उभे असल्यास वाहनधारकांकडून टोल घेता येणार नाही, अशी घोषणा शासनाकडून करण्यात आली होती. मात्र, बहुतांश टोल नाक्यांवर याची अंलबजावणीच केली जात नाही. तसेच कोणते वाहन या पट्ट्याबाहेर व आत आहे हे ठरवणारी यंत्रणाच उपलब्ध नसल्यामुळे बेकायदेशीर टोल वसुलीचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी वाददेखील होतात, हे टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी भाजपचे भाई गिरकर, प्रवीण दरेकर  यांनी प्रश्नाेत्तरांच्या तासात केली. ज्या टोल नाक्यांची वसुली पूर्ण झाली ते टाेल नाके बंद करणार का? असा सवाल उपस्थित करून त्यासंदर्भात शासन काय कार्यवाही करत आहे, असा प्रश्न केला. त्यावर  मंत्री शिंदे म्हणाले, राज्यातील टोल नाक्यांवर पिवळा पट्टा नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी दक्षता पथक तैनात करण्यात येणार आहे.  राज्य रस्ते विकास महामंडळाचे पाच कर्मचारी तसेच माजी वाहतूक पोलिस अधिकारी यांच्या देखरेखीखाली हे दक्षता पथक काम करेल. पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर उभ्या असणाऱ्या वाहनांकडून टोल वसुली न करण्यासंदर्भात  केंद्र शासनाचे नियम व निकष, करारनाम्यातील तरतुदी, कायदेशीर व तांत्रिक बाबी तपासण्याची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.  दरम्यान, शिंदे यांच्या घोषणेची अंमलबजावणी झाल्यास नागरिाकांना याचा फायदा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...