आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमराठी शेतकरी नाणार प्रकल्पात होणार मालामाल, कोकणी माणूस राहणार उपाशी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पास शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्याचा सरकारचा दावा असला तरी बाधित १४ गावांतील ज्या शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी होकार दर्शवला आहे, ते बहुसंख्य कोकणाबाहेरचे अमराठी अाहेत. अधिसूचना निघण्याच्या वर्षभरापूर्वी त्यांनी अल्प मोबदल्यात या जमिनी खरेदी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पात कोकणी माणूस उपाशी राहणार, असे स्पष्ट झाले आहे.  


गोठीवरे गावची २६०० एकर जमीन या तेलशुद्धीकरण प्रकल्पात जाणार आहे. त्यापैकी ५५० एकर जमिनीची संमतीपत्रे (भूसंपादनास ना हरकत) दाखल झाली आहेत. ज्या ८६ शेतकऱ्यांनी संमतीपत्रे दाखल केली आहेत, त्यापैकी ५६ शेतकरी केवाडिया, शहा, भुताडिया, राठी,  मोदी असे अमराठी आहेत. तसेच या मंडळींनी केवळ वर्षभरापूर्वी येरम, नार्वेकर, सोड्ये या वर्षानुवर्षे कोकणचे निवासी असलेल्या शेतकऱ्यांकडून सदर जमिनी खरेदी केल्याचे खरेदीखतावरून स्पष्ट होते आहे. उपळे, विल्ये, तारळ, कात्रादेवी, साखर, चौके, दत्तवाडी या प्रकल्पबाधित सर्व गावांत अशीच परस्थिती आहे. ज्या शेतकऱ्यांनी राजापूर उपविभागीय अधिकाऱ्याकडे संमतीपत्रे दाखल केली अाहेत, त्यातील ८० टक्के शेतकरी त्रिपाठी, सिंघवी, जैन, वाधवा या आडनावाचे आहेत. वैद्य, सोमण, झोरे, भातखंडे, गोगटे अशा आडनावाचे शेतकरी संमतीपत्राच्या यादित क्वचितच आहेत.


प्रकल्पबाधित १४ गावांत वर्षभरापूर्वी काेकणाबाहेरच्या हजारो मंडळींनी जमिनी खरेदी केल्या आहेत. या मंडळींना नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प हवा आहे. कारण, त्यांनी सुमारे तीन ते चार लाख रुपये एकर दराने खरेदी केलेल्या जमिनीस भूसंपादनाच्या कायद्यान्वये कोटीत मोबदला मिळणार आहे, असा आरोप कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी ‘दिव्य मराठी’कडे केला. एकूणच, नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पात ३ हजार २०० कुटुंबांना त्यांची जन्मजात घरेदारे सोडावी तर लागणार आहेतच, पण कवडीमोल दराने जमिनीची विक्री केल्याने भूसंपादनातील कोटीच्या मोबदल्यासही मुकावे लागणार आहे.  

 

काय आहे प्रकल्प?  
नाणार (ता. राजापूर) येथे होणारा आशियातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे. १६००० एकरांच्या प्रकल्पात १४ गावे आणि ३२०० कुटुंबे विस्थापित होणार आहेत. तीन लाख कोटी गुंतवणुकीच्या या प्रकल्पातून १ लाख नवे रोजगार निर्माण होणार आहेत, असा राज्य सरकारचा दावा आहे.

 

जानेवारी ते ऑक्टोबर २०१७ जमिनी केल्या खरेदी

प्रकल्पबाधित चौदा गावांतील वर्षभरापूर्वी झालेले जमीन खरेदीचे सर्वच व्यवहार धक्कादायक असे आहेत. वर्षभरापूर्वी म्हणजे जानेवारी ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान हे व्यवहार झालेले दिसतात. तसेच या व्यवहारातील जमिनीचा दर एकरी तीन-साडेतीन लाख इतका अल्प आहे. मे २०१७ मध्ये नाणार प्रकल्पाचे प्राधिकरण असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) प्रकल्पासाठी १६ हजार एकर जमीन अधिसूचित (नोटिफाइड) केली. सध्या ज्या मंडळींनी भूसंपादनासाठी जी संमतिपत्रे दाखल केली आहेत, त्यामध्ये सर्वांनीच हेक्टरी एक कोटी इतका मोबदला मिळावा, अशी मागणी केली आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...