आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक, दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारपूर्वीच तहकूब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंगळवारी राज्य सरकारला पुन्हा एकदा विरोधकांच्या आक्रमक टीकेचा सामना करावा लागला. याच मुद्द्यावरून विधानसभा व विधान परिषदेत बोलू न दिल्याचा आरोप करत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे दाेन्ही सभागृहांचे कामकाज दुपारपूर्वीच तहकूब करावे लागले.   


राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे, असा दावा करत विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी हा विषय उपस्थित केला. या योजनेचे लाभ शेतकऱ्यांना मिळत नाहीत. कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही राज्यात सुमारे दोन हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे स्थगन प्रस्तावाद्वारे या विषयावर चर्चा करण्याची मागणी विखे पाटील यांनी केली. तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची यादी देतो, असे आश्वासन देऊनही लाभार्थी शेतकऱ्यांची यादी अद्याप जाहीर झाली नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी मांडला. तसेच विरोधकांचा प्रस्ताव स्वीकारून त्यावर चर्चा करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. मात्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनी प्रस्ताव नाकारल्याचे सांगत हा विषय वेगळ्या चर्चेच्या माध्यमातून आणावा, अशी सूचना विरोधकांना केली. मात्र, चर्चेचा आग्रह धरत विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेतली.

 

शेतकरी गुन्हेगार वाटतात का :  मुंडे  
परिषदेत विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले ,‘अाम्ही १७ जिल्ह्यांत दौरा केला, एकही कर्जमाफी झालेला शेतकरी भेटला नाही. हिवाळी अधिवेशनात जाहीर केलेली बोंडअळीची नुकसान भरपाई मिळाली नाही. गारपिटीची नुकसान भरपाई मिळाली नाही. धर्मा पाटील यांना मृत्यूनंतरही त्यांच्या वारसांना न्याय मिळाला नाही. शेतकऱ्यांना मदत करणे तर दूरच, त्यांच्या गळ्यात पाट्या लावून पंचनामे मात्र सुरू आहेत, शेतकरी तुम्हाला गुन्हेगार वाटतात का?’ असा सवाल त्यांनी केला. गारपिटीत शेतकऱ्यांनी पशुधन गमावले. अधिकारी म्हणतात कोंबड्या दगावल्या तर त्यांचे शवविच्छेदन करा. इतका तुघलकी निर्णय सरकार कसा काय घेऊ शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

याद्या जाहीर करण्याची मागणी फेटाळली  
परिषदेतही कर्जमाफीचा मुद्दा गाजला. कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसून सरकार शेतकऱ्यांना तुघलकी वागणूक देत असल्याचा आरोप करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. तत्पूर्वी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा स्थगन प्रस्तावाद्वारे मांडत सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी, अशी मागणी केली. मात्र सभापतींनी हा प्रस्ताव फेटाळल्याने विरोधकांनी सभापतींच्या समाेरील जागेत येऊन घोषणाबाजी केली. या गदारोळामुळे परिषदेचे कामकाज पहिल्यांदा वीस मिनिटे आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.  

बातम्या आणखी आहेत...