आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक, थर्माकोल बंदीचे प्रारूप लवकरच राजपत्रात; रामदास कदम यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात संपूर्ण प्लास्टिक व थर्माकोल बंदीसंदर्भात प्रारूप अधिसूचनेचा आराखडा तयार करण्यात आला असून तो शासनाच्या राजपत्रात लवकरच प्रसिद्ध केला जाईल, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी साेमवारी सांगितले. मंत्रालयात प्लास्टिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत बोलत होते.  


कदम म्हणाले, महाराष्ट्रात प्रतिदिन १८०० टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. त्याचा फार मोठा परिणाम पर्यावरणावर होत आहे. त्यासाठी येत्या गुढीपाडव्यापासून संपूर्ण प्लास्टिक बंदी लागू करण्यावर भर देण्यात येणार आहे. प्लास्टिक पिशव्या, थर्माकोलपासून बनवलेल्या प्लेट्स, ताट, वाट्या, ग्लास, चमचे, कप,फ्लेक्स, बॅनर्स, तोरण अशा वस्तूंवर राज्यात बंदी केली जाणार आहे. प्लास्टिक उत्पादन करणारे कारखाने, साठवणूक करणारे, वापर करणारे अशा सर्व घटकांवर कायदेशीररीत्या कारवाई करण्यात येणार आहे. या नियमांच्या कडक अंमलबजावणीसाठी व दंडात्मक कारवाईसाठी मनपा आयुक्त, आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, मुख्य कार्य अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षणाधिकारी, प्रदूषण मंडळाचे  अधिकारी, पोलिस निरीक्षक, वाहतूक पोलिस, पोलिस पाटील, वन अधिकारी, विक्रीकर अधिकारी आदींना प्राधिकृत केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण)  कायदा २००६ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक पर्याय निर्माण करण्यासाठी व जनजागृतीसाठी बचत गट, सेवाभावी संस्था यांना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन विकास निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा, असेही या प्रारूप आराखड्यात नमूद केले अाहे.’  
या वेळी प्लास्टिकच्या रिसायकलिंगद्वारे ऑइल तयार करणे, चटाया तयार करणे, गार्डनमधील प्लास्टिक बेंचेस, प्लास्टिक दोऱ्या कशा तयार करू शकतो याची माहिती प्लास्टिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिली.  


या वेळी झालेल्या बैठकीला पर्यावरण विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई, महाराष्ट्र प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे पदाधिकारी  आणि इतर अधिकारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...