आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रांचा जिव्हाळा नव्याने कळला- सयाजी; ‘चला हवा येऊ द्या’तील पत्राच्या संकलनाचे प्रकाशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- टपालाने येणारे पत्र व ते घेऊन येणारे पोस्टमनकाका या दोन्ही गोष्टी पूर्वी जिवाभावाच्या असायच्या. पण नवीन तंत्रज्ञानाचे आविष्कार असलेल्या एसएमएस व ई-मेलमुळे टपालाने येणाऱ्या पत्राचे महत्त्व संपत चालले आहे. परंतु, या पत्रांबद्दल जनमानसात काय जिव्हाळा होता हे आता नव्या पिढीला अरविंद जगताप यांनी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात लिहिलेल्या विविध पत्रांनी नव्याने कळले. त्या पत्रांचे संकलन करून ग्रंथालीने प्रकाशित केलेले ‘पत्रास कारण की...’ हे पुस्तक त्यामुळेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.  


ग्रंथाली वाचक दिनानिमित्त दादर पश्चिम येथील कीर्ती महाविद्यालयामध्ये सोमवारी आयोजित कार्यक्रमात अरविंद जगताप यांच्या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेता डॉ. नीलेश साबळे आणि सयाजी शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी अभिनेते रमेश भाटकर, दिग्दर्शक संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.    या वेळी डॉ. नीलेश साबळे म्हणाले की, “चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा काही महिने त्याचे स्वरूप विनोदीच होते. परंतु विनोदाबरोबरच विचार दिला तर तो कार्यक्रम अधिक उत्तम होईल, असे मत समोर आले. मग आम्ही पोस्टमनकाका अशी एक व्यक्तिरेखा या कार्यक्रमात समाविष्ट करून त्यांच्या तोंडून ताज्या विषयावरचे पत्र सादर करू लागलो. ही पत्रे अरविंद जगताप लिहितात. त्यांची सामाजिक बांधिलकी या पत्रांच्या लेखनातून स्पष्टपणे जाणवते. महाराष्ट्रातील प्रेक्षकांना ही पत्रे विलक्षण आवडली. आता या पत्रांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे हा अजून एक वेगळा पैलू आहे.  या वेळी अरविंद जगताप यांनी सांगितले की, पत्र खरे तर खासगी गोष्ट असते. चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून विविध विषयांवरील पत्रांचे लेखन करत गेलो. लेखकाला आपण जे लिहितो त्याची अभिव्यक्ती उत्तम व्हावी, असे वाटत असते. सागर कारंडे यांनी पोस्टमनकाका बनून या पत्रांचे अत्यंत प्रत्ययकारी अभिवाचन केले. त्यामुळे त्या पत्रांनी प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला. त्यामुळे सागर कारंडे यांचेही या प्रक्रियेतील योगदान मोठे आहे.   

बातम्या आणखी आहेत...