आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा नुसता शो चालू आहे. मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्रातून घडत काहीच नाही. गुंतवणुकीचे आकडे फुगवून सांगितले जात आहेत. माध्यमे, न्यायसंस्थांवर दबाव टाकला जातो आहे. हे असेच चालू राहिले तर देश बरबाद होईल. म्हणून २०१९ च्या निवडणुकीत देशाला तिसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून द्या, ‘देश मोदीमुक्त करा’ अशी हाक मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्कवर दिली. एकत्र या, एकत्र लढा आणि देशाला झालेला मोदी आजार संपवा, असे आवाहनही त्यांनी मराठी बांधवांना केले. दादरच्या शिवाजी पार्कवर गुढीपाडव्यानिमित्त मनसेच्या वार्षिक मेळाव्यात राज बोलत होते.
मोदी, फडणवीस टार्गेट
राज यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्यातील प्रश्न संपले असावेत, म्हणूनच मुख्यमंत्री गाणे गात असावेत. आमचे मुख्यमंत्री म्हणजे वर्गातला माॅनिटर आहे. जो शिक्षकांना आवडतो, पण विद्यार्थ्यांचा नावडता असतो. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना त्यांनी शोले चित्रपटातील सांबा आणि अभिनेता रजनीकांत यांचा बारावा डमी असे संबोधले.
श्रीदेवीचा मृतदेह राष्ट्रध्वजात कसा?
नीरव मोदीचे प्रकरण मागे टाकण्यासाठी श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी सुरू केली, अशी टीका राज यांनी माध्यमांवर केली. दारू पिऊन जिचा मृत्यू झाला तिचा मृतदेह राष्ट्रध्वजात लपेटून कसा आणला, असा सवाल त्यांनी केला. इतरांच्या बाबतीत रकानेच्या रकाने, पण फडणवीस सरकारबाबत माध्यमे ब्र काढत नाहीत, असा गंभीर आरोप केला.
हे तर हिटलरचे तंत्र
केंद्राच्या सांगण्यावरून अनेक संपादक, पत्रकारांना काढून टाकण्यात आल्याचे राज म्हणाले. मोदी-शहा यांच्या विरोधात लिहिले तर जाहिराती मिळत नाहीत. विरोधात बातम्या लिहू दिल्या जात नाहीत. ही आणीबाणी नाही तर काय आहे? श्रीदेवीची बातमी जितकी दाखवली तितक्या वेळा न्यायाधीश लोया यांच्या बातम्या दाखवल्या का? तोही मृत्यू संशयास्पदच आहे. ही लोकशाही आहे का? हे अच्छे दिन आहेत?’ असे म्हणत मोदी-शहा यांचे राजकारणाचे हे तंत्र हिटलरचे असल्याचा दावा त्यांनी केला.
गडकरी फुगे सोडतात
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आकड्यांचे फुगे सोडतात. राज्यात ५६ हजार विहिरी बांधल्याची राज्य सरकारची थाप आहे. राज्यात शेतकऱ्यांचे राज्य नाही, तर दलालांचे आहे. म्हणूनच शेतकऱ्यांना जमिनीचा भाव मिळत नाही, असे आरोप केले.
अंबानींना कंत्राट कसे मिळाले? : राज म्हणाले, मोदी सरकारने बेरोजगारांची नोंदणी करणे बंद केले. अारक्षणासाठी जातीजातीत भांडणे लावली जात आहेत. पात्रता नसताना राफेल कंपनीचे अंबानींच्या कंपनीला कंत्राट कसे मिळाले?
अहमदाबादच का?
परदेशी राष्ट्राध्यक्षांना अहमदाबादलाच कसे नेता, असा प्रश्न उपस्थित करून पंतप्रधानांनी प्रादेशिक अस्मिता जपली असल्याचे राज म्हणाले.
नोटबंदी भयंकर घोटाळा : नोटबंदी हा १९४७ नंतरचा देशातला सर्वात मोठा घोटाळा आहे. पुन्हा भाजपचे सरकार आले तर लोकांची वाट लागेल. जे काँग्रेसच्या काळात जेलमध्ये गेले, ते भाजपच्या काळात बाहेर आले. काँग्रेसच्या काळात जे घडत होते, तेच भाजपच्या काळातही घडतेय, असे सांगत घोटाळेबाज नीरव माेदी पळालाच कसा, असा सवाल राज यांनी विचारला.
शिवसेना, उद्धव, दाेन्ही काँग्रेसबाबत माैन
बाळासाहेब ठाकरे नेहमीच हिटलरचे समर्थन करायचे. ३७ व्या वाढदिवशी म्हणजे २००५ मध्ये शिवसेनेत असताना राज ठाकरे यांनीही तीच भूमिका मांडली हाेती. अाता मात्र ते माेदी-शहांच्या राजकारणाला विराेध करत त्यांची तुलना ‘हिटलरशाही’शी करतात.
- प्रत्येक सभेत उद्धव व शिवसेनेवर कडाडून हल्ला करणाऱ्या राजनी या मेळाव्यात मात्र या दाेन्हींचा नामाेल्लेखही केला नाही.
- राज यांनी दाेन्ही काँग्रेसबद्दलही चकार शब्द काढला नाही. उलट विराेधकांना एकत्र येण्याचे अावाहन केले. शरद पवार यांच्या भेटीनंतर राज यांची ही भूमिका वेगळे संकेत देते.
आता दंगली घडवतील
आगामी लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपवाले दंगली घडवतील. त्यासाठी न्यायालयात राम मंदिराचा वाद पुढे ढकलला जातो आहे. राममंदिर व्हायला पाहिजे, पण त्याचा वापर निवडणुका जिंकण्यासाठी नको, असे ते म्हणाले.
क्षणचित्रे
१. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाजी पार्कातल्या पुतळ्याला अभिवादन करुन राज मंचावर आले.
२.दशरथ शिर्के यांनी राज ठाकरे यांना तलवार तर संजय दामदार यांनी राज यांना विठ्ठलमूर्ती भेट दिली.
३. भारतीय किसान सभेच्या लाँग मार्चला दिलेल्या पाठिंब्याबाबत राज यांना भाजी टोपली भेट देण्यात आली.
४. मनसे पक्ष संपला असं ज्यांना ज्यांना वाटतं, त्यांना हा जिवंत महाराष्ट्र पसरलेला पाहा, अशी राज यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
५.गेल्या वर्षी कौटुंबिक विवंचनेत असल्याने मेळावा झाला नाही, मात्र यंदापासून दर गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर वार्षिक मेळावा होईल, अशी घोषणा त्यांनी भाषणापूर्वी केली.
हेही वाचा
राज ठाकरेंनी आपला स्तर पाहून बोलावे, भाषणांवर शरद पवारांचा प्रभाव; भाजप नेत्यांची टीका
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.