आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे बंधुत दुरावा वाढला; ‘राज’पुत्राच्या साखरपुड्याचे उद्धव यांना निमंत्रण नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित यांचा साखरपुडा मुंबईत साेमवारी पार पडला. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आमंत्रणच देण्यात आले नव्हते. काही दिवसांपूर्वी मनसेच्या मुंबई मनपातील सहा नगरसेवकांना फोडत शिवसेनेने राज यांना दिलेल्या झटक्यानंतर ठाकरे बंधूंमधील दुरावा वाढल्याची चर्चा होतीच. मात्र राज यांनी उद्धव यांना साखरपुड्याचे आमंत्रणही देण्याचे टाळल्याने त्यांचे कौटुंबिक व औपचारिक  दुरावल्याचे स्पष्ट झाले. राज ठाकरे कुटुंबीय आणि जवळचे स्नेही अशा जवळपास शंभर एक मोजक्याच विशेष आमंत्रितांच्या हजेरीत रेसकाेर्सजवळील टर्फ क्लबमध्ये अमित यांचा साखरपुडा मिताली बोरुडे हिच्याशी पार पडला. 

 

मात्र पुतण्याच्या साखरपुड्याला काका उद्धव यांच्या गैरहजेरीची चर्चा चांगलीच रंगली. आतापर्यंत राजकीय व्यासपीठावरून राज आणि उद्धव यांनी जरी एकमेकांवर सडकून टीका केली असली, तरीही कौटुंबिक सोहळे आणि एकमेकांच्या सुखदु:खात हे दोन्ही भाऊ एकमेकांच्या मदतीला धावून जात असत. काही वर्षांपूर्वी जेव्हा उद्धव ठाकरेंवर अॅन्जिओप्लास्टी झाली होती, तेव्हा मदतीसाठी रश्मी ठाकरेंनी सर्वात पहिला फोन राज ठाकरेंना केला होता. उद्धव यांच्या जिवावरचे हे दुखणे पार पडल्यानंतर राज यांनी स्वत: कार चालवत उद्धव यांना रुग्णालयातून घरी नेले होते. त्यानंतर राज यांच्या पत्नी शर्मिला यांच्यावर घरातील पाळीव श्वानाने केलेला गंभीर हल्ला असो की अमित ठाकरेंचे दुर्धर आजारपण असो, या अडचणीच्या कालावधीत उद्धव यांनीही राज यांच्या मदतीसाठी रुग्णालयात धाव घेतली होती. मात्र अाता मनसेचे सहा नगरसेवक फोडत उद्धव ठाकरेंनी केलेल्या आगळिकीनंतर मात्र संतापलेल्या राज यांनी त्यांच्याशी औपचारिक संबंध तोडून टाकले आहेत. या सर्व घडामोडींचीच परिणती अखेर अमित यांच्या साखरपुड्याला उद्धव ठाकरेंना आमंत्रण न देण्यात झाल्याचे समजते.   


स्मिता ठाकरेंची उपस्थिती 
अमित यांच्या साखरपुड्याला उद्धवसोबत जयदेव ठाकरेही गैरहजर होते. मात्र जयदेव यांच्या पहिल्या पत्नी स्मिता ठाकरे आपल्या राहुल या पुत्रासह आवर्जून उपस्थित होत्या. त्याचबरोबर राज ठाकरे यांचे मामा चंदू वैद्य, बहीण जयजयवंती, शर्मिला ठाकरे यांच्या आई आदी जवळचे नातेवाईक सहकटुंब हजर होते. अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, रिटा गुप्ता या मनसेच्या नेत्यांसह राजन शिरोडकर, जयेश गांधी आदींची उपस्थिती होती. 

बातम्या आणखी आहेत...