आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 रुपये अनुदान न दिल्यास 16 जुलैपासून मुंबईचे दूध बंद करणार, राजू शेट्टींचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गायीच्या दुधाला पाच रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीतर १६ जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी मुंबईत दिला, तर दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का? अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देत दूध रोखूनच दाखवा, असे अावाहनही राजू शेट्टी यांना केले.

 

शेट्टी म्हणाले, पुण्यात साखर आणि दूध प्रश्नी २९ जून रोजी मोर्चा काढून सरकारला इशारा दिला होता. मात्र, सरकारने याकडे कानाडोळा केला. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच दूध धंदा तोट्यात गेला आहे. दूध भुकटी,पावडर आणि लोणी जीएसटीमधून वगळावे, अशी मागणीही आम्ही केली. दुधाच्या बाबतीत शासनाने काहीही केलेले नसल्याने १६ जुलैपासून मुंबईत दुधाचा एक थेंबही येऊ देणार नाही. वेळ प्रसंगी दूध वारकऱ्यांना वाटू पण मुंबईत दूध कोणत्याही परिस्थितीत येऊ देणार नाही. त्यासाठी वाट्टेल ते करायची आमची तयारी आहे. दूध संकलन आणि दूध विक्री बंद आंदोलनामुळे जी परिस्थिती उद्भवेल त्यास सरकार जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला. दुधाचा उत्पादन खर्च ३५ रुपये लिटरवर जाऊन पोहोचला असून शेतकऱ्यांना मात्र १५ रुपये दर मिळतोय. याबाबत दूध संघाच्या प्रतिनिधीसह प्रत्यक्ष भेटून सरकारकडे समस्या मांडली होती. यावर सरकारने दुधाच्या भुकटीसाठी तीन रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ५३ कोटी रुपये खर्चही करण्यात आले. मात्र या ५३ कोटी रुपयांपैकी एक रुपयाही दूध उत्पादन करणाऱ्यांना मिळाला नाही.

 

हा काय पाकिस्तान आहे का : चंद्रकांत पाटील
दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का? घरातले दूध आणि भाजीपाला रस्त्यावर का ओतता? असा प्रश्न मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेट्टी यांना केला.

 

बातम्या आणखी आहेत...